CM Uddhav Thackeray On Dilip Walse Patil : शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला देखील गेले होते. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असल्याच्या वृत्ताचं स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी खंडन केले आहे.  अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.


मुख्यमंत्री सचिवालयाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे की, गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


गृहखातं भाजपबद्दल 'सॉफ्ट' असल्यानं शिवसेनेची नाराजी?


शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांना भेटले. राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं सेनेला मिळावं, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे.  गृहखातं भाजपबद्दल  सॉफ्ट असल्यानं  शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळाली होती.  भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यात गृहखातं कमी पडत असल्याची शिवसेनेची भावना आहे. प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या प्रकरणात कारवाई न झाल्यानं शिवसेनेची नाराजी असल्याचं बोललं जात होतं. 


गेले काही दिवस महाविकास आघाडीतले अनेक नेते गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. त्यानंतर वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले.  


संजय राऊतांनी आज नेमकं काय म्हटलं...
आज संजय राऊतांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात  ईडीची कारवाई हे गृहखात्यावरचं आक्रमण आहे असं वक्तव्य आज संजय राऊतांनी केलं. त्यांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला उद्देशून होतं का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. राऊतांनी म्हटलं की,  गृहखात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसतात. हे खरंतर गृह खात्यावरचं आक्रमण आहे.  


भाजप नेते सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीची अडीच वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये एक्स्चेंजची वेळ आली आहे का? म्हणजे राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे गृहमंत्रीपद असा काही विचार सुरू आहे का? असं ते म्हणाले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha