पांडुरंगाची प्रक्षाळपूजा... 20 दिवसानंतर बा विठ्ठलास आराम, भक्तांसाठी तोही रात्रंदिवस उभाच राहिला
तब्बल 20 दिवसाच्या शिणवट्यानंतर आज प्रक्षाळ पूजेनंतर देवाच्या राजोपचाराला सुरुवात होत असून देवाचा पलंग बसविल्याने आता विठुरायाला रोज निद्रा घेता येणार आहे
सोलापूर : आषाढी, कार्तिकी भक्तगण येती.. असे म्हणतात अन् ते सर्वजण पाहतात. नुकेत आषाढी वारीची भव्यदिव्य सोहळा पार पडला. लक्षावधी वारकऱ्यांनी ऊन, वारा, पाऊस झेलत पंढरी (Pandhari) गाठली. तासनतास रांगेत उभे राहून लाडक्या विठुरायाचे (Vithhal) मनमोहक रुप न्याहाळले, पांडुरंगाचे दर्शन घेतले. भक्तांच्या भेटीने बा विठ्ठलालाही आनंदी-आनंद झाला आहे. कारण, भक्तांसाठी गेल्या 20 दिवसांपासून विठुरायाही ताटकळत उभा राहिला होता. तब्बल 20 दिवसांच्या आषाढी (Ashadhi) यात्रेतील शिणवट्यानंतर आज आज विठुरायाची प्रक्षाळ पूजा करुन सर्व राजोपचाराला सुरुवात झाली. विशेष म्हणजे वारकरी, भक्त आपापल्या घरी पोहोचल्यानंतर आता, विठ्ठल मंदिरातही देवाचा पलंग बसविण्यात आला आहे, त्यामुळे आजपासून देवालाही निद्रा मिळणार आहे.
तब्बल 20 दिवसाच्या शिणवट्यानंतर आज प्रक्षाळ पूजेनंतर देवाच्या राजोपचाराला सुरुवात होत असून देवाचा पलंग बसविल्याने आता विठुरायाला रोज निद्रा घेता येणार आहे. आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी 7 जुलै रोजी देवाचा पलंग काढून 24 तास दर्शन देत विठुराया उभा होता. आज प्रक्षाळपुजेनंतर पुन्हा देवाचे राजोपचार सुरू झाले असून आजपासून 24 तास सुरु असलेली दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे.
पंढरपुरात प्रक्षाळ पूजा म्हणजे प्रक्षालन करणे, म्हणजेच सफाई करणे होय. हि परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या यात्रेनंतर ही प्रक्षाल पूजा होत असते. यंदा आषाढीला जवळपास 18 ते 20 लाख भाविक आल्याने गेले 20 दिवस देव रात्रंदिवस भाविकांना दर्शन देत उभा होता. त्यामुळे देवाला आलेला शिणवटा घालवण्यासाठी सकाळी देवाला पहिले गरम पाण्याचे स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवाच्या पायाला आलेला थकवा घालवण्यासाठी भाविकांनी देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून दर्शन घेतले. यासाठी देवाच्या पायावर चांदीचे कवच लावण्यात आले होते.
20 दिवस पांडुरंग वारकऱ्यांच्या सेवेत
आषाढी यात्रे दरम्यान पंचमीपासून पुढे जवळपास 20 दिवस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन देता यावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो. ज्यामुळे देव झोपत नाही, अशी भावना यात असते. यावेळी देवाचे सर्व नित्योपचार बंद करून केवळ रोजची नित्यपूजा, नैवेद्य, पोशाख आणि संध्याकाळी लिंबूपाणी याचसाठी दर्शन थोड्या वेळेसाठी बंद असते. या 20 दिवसात देव झोपत नसल्याने मंदिरही 24 तास उघडे असते. गुरुवारी रात्री मंदिर समितीच्यावतीने देवाच्या सर्वांगाला तिळाच्या तेलाने चोळून मालिश करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून देवाचे अंग मोकळे करण्याची प्रथा पूर्ण केल्यावर देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर विठुरायाला रुद्राअभिषेक करण्यात आला.
याचपद्धतीने रुक्मिणी मातेकडे देखील अभिषेक करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून देवाला पंचपक्वान्नांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. संध्याकाळी पोषाखाचेवेळी देवाला ठेवणीतील वस्त्रे आणि पारंपरिक दागिन्याने सजविण्यात येणार आहे. याचवेळी विठुरायाच्या पलंग पुन्हा देवाच्या शेजघरात नेण्यात येऊन त्यावरील गाद्या, लोड बदलण्यात आले आहेत. आज रात्री शेजारतीनंतर विठुराया निद्रेसाठी जाणार असून त्यापूर्वी त्याला 21 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींच्या काढ्याचा नैवेद्य दिला जातो. आजच्या प्रक्षाळपुजेपासून आता देवाचे सर्व नित्योपचार सुरु झाले आहेत. म्हणजे, आता कार्तिकी एकादशीपर्यंत विठुरायची नित्यनियमाने पूजा होणार आहे.
हेही वाचा
भाजपने मला बेवकुफ बनवलं; शिवबंधन बांधताच माजी आमदाराचा आरोप, विधानसभेवरही स्पष्टच बोलले