वारकरी संप्रदायाचा अनोखा सन्मान! पंढरपूरच्या आषाढी वारीला जागतिक वारसा मिळणार , केंद्र सरकार यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार
Aashadhi Wari : आषाढी वारीला जागतिक वारसा म्हणून दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार आता यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवणार आहे.
Aashadhi Wari : ना आमंत्रण, ना गाड्या घोडे ना बाकी काही, तरीही आषाढी सोहळ्यासाठी (Aashadhi Wari) वैष्णवांचा मेळा अनेक मैल पायी प्रवास करत विठुरायाच्या पंढरीत पोहचतो. गेली अनेक वर्ष ही वारीच्या परंपरेचा महाराष्ट्र साक्ष देत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता, फक्त त्याच्या कळसाचे दर्शन घेण्यासाठी श्रीहरीच्या गजरात विठुरायाची पंढरी गजबजून जाते. आता या पंरपरेची जागतिक नोंद देखील घेतली जाणार आहे. लाखो वारकऱ्यांसाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी ठरणार असून महाराष्ट्रातील हा सांस्कृतिक ठेवा आता जागतिक पातळीवर जाणार आहे. केंद्र सरकार यासाठी पुढाकार घेत असून युनेस्कोकडे (UNESCO) यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
वारीची ही परंपरा शेकडो वर्षे अखंडपणे चालवत आलेल्या वारकरी संप्रदायांच्या अनेक पिढ्यांसाठी हा मोठा सन्मान ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेतला आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये वारीचा प्रस्ताव करुन यूनेस्कोकडे पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे.
काय आहे वारीचा इतिहास?
वारीची परंपरा जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरु केली. तेव्हापासून या पालखी सोहळ्याची परंपरा सुरु झाली. जवळपास गेली दिडशे वर्षे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा पालखी सोहळा देहू आणि आळंदीमधून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो. सुरुवातील या पालखी सोहळ्यामध्ये लाकडांच्या पादुका होत्या. तसेच या ज्ञानोबा तुकाराम म्हणायची सुरुवात देखील नारायण महाराजांनीच केली. संत तुकाराम यांची संत ज्ञानेश्वरांवर श्रद्धा होती. दर वैद्य एकादशीला संत तुकाराम महाराज आळंदी येथे जाऊन माऊलींच्या समाधी समोर कीर्तन करीत असत. आजही वैद्य एकादशीला कीर्तनाचा मान हा देहूकरांचा असतो.
एवढेच नाही तर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे गाभारा मंदिर हे संत तुकाराम महारांजांनी उभारले होते. त्यामुळे तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज हे सप्तमीला वडिलांच्या पादुका घेऊन आळंदीला जायचे आणि अष्टमीला माऊलींच्या पादुका देखील त्याच पालखीत ठेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ व्हायचे. नारायण महाराजांनी जेव्हा ही परंपरा सुरु केली तेव्हा त्यांच्यासोबत बाराशे वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याच्या नोंदी आजही सापडतात. म्हणून आजही संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा सप्तमीला पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा अष्टमीला पंढपूरकडे मार्गस्थ होतो.
वारीची ही अलौकिक परंपरा जागतिक पातळीवर पोहचावी यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे. याशिवाय वारीशी संबंधित सर्व साहित्य एकत्रित करण्यात येत असून पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये प्रस्ताव युनेस्कोला पाठविण्यात येणार आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ढगे पाटील तसेच संत तुकाराम पालखी सोहळ्याचे बापूसाहेब देहूकर यांनी स्वागत केले आहे.