Sant Nivruttinath Palkhi : 'धन्य धन्य निवृत्ती देवा। काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून, केले त्रैलोक्‍य पावन,  ज्ञानेश्वर माउली तुकाराम, असा हरिनामाचा गाजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. टाळ मृदूंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात असून कर्जत शहरात मुक्कामी होती. कालच्या कर्जत शहरातील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी पारगाव मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून आज वाकवड मुक्कामी असणार आहे. 


गेल्या सतरा दिवसांपासून पंढरपुरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सतरावा  दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. संत निवृत्तीनाथांची पालखी नगर जिल्ह्यात असून कर्जत शहरातील येथील मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. आज दुपारी धांडेवाडित उभे रिंगण होणार असून दुपारचे जेवण ग्रामस्थांकडून दिले जाणार आहे. 


राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल पारगावला मुक्कामी होती. आज पालखीचा सतरावा दिवस असून आज पालखीने वाकवड गावाकडे मार्गक्रमण केले आहे. आज येसवंडी गावातील ग्रामस्थांकडून दुपारचे जेवण दिले जाणार असून त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी याच मार्गाने पुढे वाकवडला मार्गस्थ होणार असून याच ठिकाणी विसावा घेणार आहे. 


धांडेवाडीत उभे रिंगण 


आज संत निवृत्तीनाथांची पालखी कर्जतहून पंढरपूर कडे मार्गस्थ झाली आहे. आज कोरेगावला मुक्कामी जाणार आहे.. तत्पूर्वी कर्जतहून निघाल्यानंतर नेटाकेवाडी मार्गे धांडेवाडीत दुपारच्या विसाव्याला जाणार आहे. याच ठिकाणी माऊलींचे उभे रिंगण पार पडणार असून हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी दिंडीत सहभागी आहेत. धांडेवाडी ग्रामस्थांनी रस्त्यावर सडा सारवण करत रांगोळ्याची उधळण केली आहे. गाव जणू नव्या नवरीवानी नटला असून रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अबालवृद्ध नटून थटून पालखीची वाट पाहत आहेत. आज अवघा गाव जमला असून हा उभा रिंगणाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी वर्षभर या परिसरातील लोक आतुर झालेले आहेत. त्यामुळे आज दुपारी धांडे वाडीत उभ्या रिंगणाचा मोठा उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. 


आज पालख्यांचा मुक्काम कुठे?


संत निवृत्तीनाथांची पालखी आज अहमदनगर जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर पोहचली असून आज कर्जत तालुक्यात प्रवेश केला आहे. पुढे मार्गक्रमण करत कर्जत शहरात मुक्कामी असलेली संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने नेटाकेवाडी, धांडेवाडी, अंबी जळगावमार्गे कर्जतहून वीस किलोमीटरवर असलेल्या कोरेगावला मुक्कामाला पोहचणार आहे. तर संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत 279 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. बीड येथून पायी मार्गाने निघालेली संत मुक्ताबाईंनी पालखी पायी मार्गाने लोनखास, संनेवाडी, कुंथलगिरी फाटा, येसवंडीमार्गे वाकवडला मुक्कामी असणार आहे. आतापर्यत मुक्ताईनगर पासून पालखीने तब्बल 328 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. आज दिंडी वाकवड मुक्कामी जाणार आहे.