Ashadhi Wari 2023 :  श्रीहरिच्या गजरात पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. आजपासून आषाढ महिन्याला सुरुवात झाली असून आषाढी एकादशीला (Ashadhi Wari) अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या पंढरीत वारकऱ्यांचा मेळा जमण्यास देखील सुरुवात झाली आहे. तसेच टाळ मृदुगांच्या गजरात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांच्या पालख्यांचे मार्गक्रमण होत आहे. त्यामुळे आता संपूर्ण वारकरी संप्रदायाला आता विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. 


श्री महंमद महाराजांच्या पालखीचे पंढपूरच्या दिशेने प्रस्थान 


अहमदनगरच्या श्रीगोंदा येथील संत श्री महंमद महाराजांची दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या शेख महंमद महाराजांची दिंडी यंदा पहिल्यांदाच पंढरपूरकडे मार्गस्थ झालीये. संत महंमद महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे समकालीन सुफी संत होते. या दिंडीत जवळपास दोन हजार भाविकांनी सहभाग घेतला आहे. एकीकडे देशभरात धर्मामुळे वाद होत असल्याच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे एका सुफी संतांची पालखी पंढपूराकडे मार्गस्थ झाल्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला जात आहे. सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शेख महंमद महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून हरिनामाचा जयघोष करत पालखी पंढपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.


संत मुक्ताबाईंच्या पालखीने पार केला मांजरसुंबा घाट


संत मुक्ताबाई यांची पालखी बीडमध्ये मुक्काम करून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. दरम्यान वाटेत असलेल्या मांजरसुंबा घाटामध्ये तीन बैल जोड्या लावून या पालखीने घाट सर केला. मंजिरी आणि वडगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोड्या पालखीला लावून या पालखीचा घाटातला मार्ग सुखकर केला. दरवर्षी संत मुक्ताबाई यांची पालखी बीडमध्ये श्रीधर पंथ यांच्या भेटीसाठी येत असते.  त्यानंतर दोन दिवसाचा मुक्काम करून पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करते.  यावेळी वाटेत मांजरसुंबा घाट या पालखीला पार करावा लागतो.  त्यामुळे यावर्षी तीन बैल जोडीच्या सहाय्याने पालखीने हा घाट सर केला आहे. 


बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील संत मदन महाराज बिहाणी यांचा 19 वा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. याप्रसंगी कडा भागातील संत मदन महाराज यांच्या पालखीचे आगमन होताच मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. गेल्या 17 वर्षांपासून मुस्लिम समाजाकडून या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी महापंगतीचे आयोजन करण्यात येते. तर यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील टाळ मृदंगाच्या गजरावर फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या: 


Ashadhi Wari 2023 : परीट धोतराच्या पायघड्यांनी स्वागत, मेंढ्यांचं रिंगण; तुकोबांचा आजचा मुक्काम सणसरमध्ये तर लोणंदमध्ये ज्ञानोबांचा विसावा...