Pregnancy Problems: गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवतोय? वस्तू कुठे ठेवता आठवतच नाही? असं का होतं? यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात...
Pregnancy Forgetting things problem: गर्भावस्थेत सतत विसरभोळेपणा जाणवत असेल तर, तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करुन पाहा.

Pregnancy Problems: गर्भावस्थेत (Pregnancy) घरातील एखादी वस्तू कुठे ठेवली हे आठवत नाही, डॉक्टरांकडे जायला विसरणे किंवा एखादे काम करताना मध्येच पुढे काय करायचे होते हे लक्षात येत नाही, असे काही महिलांच्या बाबतीत घडते. या काळात विसरभोळेपणा वाढल्याचे किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण जात असल्याचे जाणवू शकते. गर्भावस्थेदरम्यान (Pregnant Women) होणाऱ्या या बदलांना ‘प्रेग्नन्सी ब्रेन’ (Pregnancy Brain) असे म्हटले जाते. हार्मोन्समधील बदल, अपुरी झोप, शारीरिक थकवा आणि मानसिक ताण यामुळे असे होऊ शकते. मात्र, हा त्रास सतत जाणवत असेल किंवा दैनंदिन कामांमध्ये अडथळा (Health Tips) येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
गर्भावस्थेत एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर का होतो परिणाम? (Pregnancy Forgetting things problem Symptoms and tips)
हार्मोन्समधील बदल : गर्भधारणेदरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांसारख्या हार्मोन्सच्या पातळीत मोठे बदल होतात. या बदलांचा मानसिक स्थिती, झोप आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही महिलांना नेहमीपेक्षा जास्त विसरभोळेपणा जाणवतो किंवा एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
अपुरी झोप : गर्भावस्थेत वारंवार लघवीला जाणे, छातीत जळजळ होणे, शारीरिक अस्वस्थता किंवा झोपण्यासाठी आरामदायी स्थिती न मिळणे यामुळे झोपेसंबंधी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पुरेशी आणि गाढ झोप न मिळाल्यास स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
मानसिक स्थितीत बदल : बाळाच्या जन्माची तयारी, डॉक्टरांने भेट देणे, तपासण्या, घरातील नियोजन आणि बाळाच्या आरोग्याची काळजी वाटणे अशा अनेक गोष्टी गर्भवती महिलेच्या मनात सुरू असतात. एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करावा लागत असल्याने दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते.
मानसिक ताण आणि भावनिक बदल : गर्भधारणा, प्रसूती, आर्थिक नियोजन, नोकरी आणि पालकत्वाची जबाबदारी यांविषयी मनात चिंता भासू शकते. अशा विचारांमध्ये मन गुंतल्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते आणि काही गोष्टी विसरण्याचे प्रमाण वाढू शकते.
शारीरिक थकवा : विशेषतः गर्भावस्थेच्या पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनेक महिलांना अधिक थकवा जाणवतो. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यास काम करण्याची क्षमता आणि एकाग्रताही कमी होऊ शकते.
कसा असतो गर्भावस्थेतील विसरभोळेपणा?
प्रत्येक महिलेला हा अनुभव सारखाच येतो असे नाही. काही महिलांना किरकोळ गोष्टी विसरण्याचा त्रास होतो, तर काहींना कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.
•एखादी वस्तू कुठे ठेवली आहे हे आठवत नाही.
•डॉक्टरांकडे जाणे किंवा एखादे महत्त्वाच्या कामाचा विसर पडतो.
•संभाषण सुरू असताना काय बोलायचे होते हे अचानक आठवत नाही.
•एखाद्या कामावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
•नेहमीपेक्षा जास्त वेळा आठवण करून देण्याची गरज भासते.
•विचार करण्याची गती मंदावल्यासारखी वाटते किंवा लक्ष वारंवार विचलित होते.
विसरभोळेपणा कमी करण्यासाठी काय करावे?
गर्भावस्थेदरम्यान काही साध्या सवयींचा अवलंब केल्यास दैनंदिन कामांचे नियोजन करणे आणि एकाग्रता टिकवणे सोपे होऊ शकते.
•झोपेला प्राधान्य द्या : झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा. शक्य असल्यास दिवसभरात थोडी विश्रांती घ्या.
•कामांची नोंद ठेवा : डॉक्टरांकडे जाणे, औषधे आणि महत्त्वाच्या कामांची नोंद मोबाईलमध्ये किंवा वहीत करून ठेवा.
•एकावेळी एकच काम करा : अनेक कामे एकाच वेळी करण्याऐवजी एका कामावर लक्ष केंद्रित करा.
•वस्तू ठरावीक ठिकाणी ठेवा : चाव्या, मोबाईल, कागदपत्रे आणि इतर गरजेच्या वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा.
•पौष्टिक आहार घ्या : नियमित आणि संतुलित आहाराचे सेवन करा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
•तज्ज्ञांच्या सल्ल्याने शारीरिक हालचाल करा : डॉक्टरांनी परवानगी दिल्यास चालणे किंवा गर्भावस्थेसाठी योग्य व्यायाम करा.
•कामाच्या दरम्यान विश्रांती घ्या : मानसिकदृष्ट्या थकवणारे काम करताना अधूनमधून छोटे ब्रेक घ्या.
•तणावाकडे दुर्लक्ष करू नका : चिंता किंवा मानसिक ताण सतत जाणवत असल्यास डॉक्टरांशी मोकळेपणाने बोला.
गर्भावस्थेतील विसरभोळेपणामागे केवळ हार्मोन्समधील बदल कारणीभूत असतात असे नाही. विसर पडणाचा त्रास तीव्र असेल, अचानक वाढला असेल किंवा त्यामुळे दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम होत असेल, तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा इतर लक्षणे असल्यास रक्तक्षय (ॲनिमिया), थायरॉईडचे विकार, झोपेच्या समस्या किंवा इतर आरोग्यविषयक कारणांची तपासणी आवश्यक ठरू शकते. लक्षणांनुसार डॉक्टर योग्य तपासण्या सुचवू शकतात.
गर्भावस्थेदरम्यान होणारा विसरभोळेपणा किंवा एकाग्रतेचा अभाव हा अनेक महिलांसाठी एक वेगळा अनुभव असू शकतो. हार्मोन्समधील बदल, अपुरी झोप, शारीरिक थकवा आणि मानसिक ताण यांचा त्यामागे वाटा असू शकतो. अधूनमधून एखादी गोष्ट विसरणे सहसा चिंतेचे कारण नसते. मात्र, पुरेशी विश्रांती घेणे, नियमित दिनचर्येचे पालन करणे आणि कामांचे अचुक नियोजन करणे उपयुक्त ठरते. विसरभोळेपणा तीव्र किंवा सतत जाणवत असल्यास त्याला गर्भावस्थेचा सामान्य भाग समजून दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
डॉ. सुरभी सिद्धार्थ(प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खारघर)
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























