Bhadrapada 2022 : विविध सणवारांचा श्रावण महिना संपून आजपासून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. भाद्रपद महिन्यात गणपतीचे आगमन देखील होते. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस भाद्रपद महिन्यात येतात. हे जाणून घ्या. 


28 ऑगस्ट : भाद्रपद महिना सुरुवात 


अश्विन महिना संपून 28 ऑगस्टपासून भाद्रपद महिना सुरु झाला आहे. 25 सप्टेंबरपर्यंत भाद्रपद महिना असणार आहे. या निमित्ताने भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन केले जाते. गणेश चतुर्थी साजरी केली जाते. तसेच या व्यतिरिक्त विविध सणवार भाद्रपद महिन्यात साजरे केले जातात.  


30 ऑगस्ट : हरितालिका पूजन 


भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिका (Hartalika 2022) हे व्रत केलं जातं. अखंड सौभाग्य राहावं यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. या दिवशी अनेक ठिकाणी महिला वर्ग हरतालिकेची पूजा मोठ्या संख्येने करतात. यावर्षी हरतालिका 30 ऑगस्ट 2022 (उद्या) साजरी केली जाणार आहे.


31 ऑगस्ट : गणेश चतुर्थी (चतुर्थी)


गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण चतुर्थी ते भाद्रपद महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत दहा दिवस चालत असतो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असेही म्हणतात. यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी गणपतीचं आगमन होणार आहे. 


1 सप्टेंबर - ऋषिपंचमी (पंचमी)


ऋषी पंचमी हिंदूंच्या प्रथेप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमीला येते. ज्यावेळी गणपतीचे आगमन होते त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी असते. हे स्त्रियांनी करायचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. 


1 सप्टेंबर - गजानन महाराज पुण्यतिथी - शेगांव 


गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. या दिवशी शेगांवात शेकडोंच्या संख्येने दिंड्या येतात. आणि गजानन महाराजांच्या प्रतिमेची नगरपरिक्रमा होते. या दिवशी भाविकांची फार गर्दी  जमा होते. 


3 सप्टेंबर - ज्येष्ठागौरी आवाहन (महालक्ष्मी)


यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थी असून 3 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन 4 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन आणि 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. ज्येष्ठागौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त रात्री 10 वाजून 56 मिनिटांपर्यंत आहे. 


5 सप्टेंबर - शिक्षक दिन 


आजचे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे भविष्य आहेत आणि या भविष्याला घडविण्याचे काम हे शिक्षक करतात. मनुष्याच्या आयुष्यातील शिक्षकाचे स्थान लक्षात घेऊन जगभरात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. 


7 सप्टेंबर - वामन जयंती 


पंचांगानुसार, दशावतारामधील वामन हा भगवंतांचा पाचवा अवतार आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशीला ‘वामन जयंती’ म्हणून संबोधिले जाते. विष्णूभक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन. या विरोचनाला सूर्याने एक मुकुट दिला होता. त्या मुकुटाला दुसऱ्या कोणी स्पर्श केलाच तर त्यामुळे विरोचनाला मृत्यू येईल असा शाप होता. त्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंतानी स्त्री-रूप घेऊन त्याला आपल्या नादी लावले आणि संधी साधून त्याच्या मुकुटाला स्पर्श केला त्याबरोबर विरोचनाला मृत्यू आला.


9 सप्टेंबर - अनंत चतुर्दशी 


श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती ची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या प्रथेनुसार दुपारपर्यंत मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणावी. ह्यावेळी मूर्तीचे मुख घराच्या, मंडपाच्या दिशेकडेच हवे. वाजत-गाजत मिरवणुकीने ती ठरलेल्या ठिकाणी जलाशयावर आणावी. तिथे मूर्तीला पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. पुन्हा एकदा आरती करावी. नंतर तिचे श्रद्धापूर्वक-काळजीपूर्वक सन्मानाने विसर्जन करावे, असा सर्वसाधारणपणे ह्या विसर्जनाचा विधी आहे.


10 सप्टेंबर - भाद्रपद पौर्णिमा 


भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला भाद्रपद पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी उमा महेश्वर व्रत पाळले जाते. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यास खूप फायदा होतो. या दिवशी व्रत केल्याने लोकांचे दुःख दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. या तिथीपासून पितृ पक्ष म्हणजेच श्राद्ध पक्ष सुरू होतो. या दिवशी पवित्र नदी, तलाव किंवा तलावात स्नान करणे महत्वाचे आहे. या दिवशी दानधर्म केल्यास शुभ फळ मिळते. या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानेही खूप फायदा होतो. 


10 ते 25 सप्टेंबर - पितृपक्ष


हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते त्यांच्या वंशजांना सुख-समृद्धी देतात. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे मानले जाते. यावर्षी पितृपक्ष 10 सप्टेंबरला सुरू होऊन 25 सप्टेंबरपर्यंत आहे.


13 सप्टेंबर - अंगारक संकष्ट चतुर्थी 


कुठल्याही कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला ज्या प्रदेशात चंद्रोदय होत असेल, ती तिथी ही संकष्ट चतुर्थी आणि माध्यान्हकाळी जिथे शुक्ल चतुर्थी मिळत असेल, ती विनायक चतुर्थी, असा याबाबतचा ढोबळ नियम आहे. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारकी’ म्हणण्याची प्रथा आहे. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते.


25 सप्टेंबर - सर्वपित्री अमावास्या


भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचे सोळा दिवस पितृकार्यासाठी अतिशय योग्य असल्याचे आपल्या धर्मशास्त्रात म्हटले आहे. आपल्या आप्तेष्टांपैकी जे ज्या तिथीला मृत पावले असतील त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करावे, असा शास्त्रसंकेत आहे. वास्तविक भाद्रपदाचा कृष्ण पक्ष म्हणजे महालयपक्ष अर्थात ‘पितृपक्ष’ म्हणून ओळखला जातो. परंतु एखादी व्यक्ती पौर्णिमेला गेली असल्यास तिचे श्राद्धकर्म भाद्रपद पौर्णिमेला आणि ते न जमल्यास सर्वपित्री अमावास्येला करण्याची प्रथा आहे. त्या त्या तिथीला असे श्राद्ध करणे शक्य नसेल तर अशावेळी अथवा एखाद्या आप्तसंबंधिताची निश्चित तिथी ज्ञात नसल्यास अशा सर्वांचे भाद्रपद अमावास्येला एकत्रितपणे श्राद्ध केले जाते; म्हणून ह्या अमावास्येला ‘सर्वपित्री दर्श अमावास्या’ असे म्हटले जाते.


महत्वाच्या बातम्या :