मुंबई: आधीच महागाईने पिचलेल्या मुंबईकरांना आता सणासुदीच्या दिवसात आणखी महागाईला सामोरं जावं लागणार आहे. मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे ताज्या दुधाच्या किमतीत पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक महासंघाने घेतला आहे. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबई दूध उत्पादक महासंघाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक लिटर दुधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत. 


जे ब्रॅन्डेड किंवा पॅकेटबंद दूध नसते, ज्याची विक्री सुट्या पद्धतीने केली जाते अशा दुधाच्या किमतीत वाढ होणार आहे. या पद्धतीच्या दुधाची विक्री घरोघरी जाऊन केली जाते. जनावरांच्या चाऱ्याचे दर दुप्पट झाले आहेत. तसेच तूर, हरभऱ्याच्या किमती 15 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे ताज्या आणि सुट्या दुधाचे दर वाढवले असल्याचे मुंबई दूध उत्पादक महासंघाचे सदस्य सी के सिंह यांनी सांगितले. 


मुंबई दर दिवशी सुटे ताजे दूध सात लाख लिटर विकले जाते. त्याची आधी किंमत ही एक लिटरसाठी 75 रुपये इतकी होती. आता ती 80 रुपये इतकी होणार आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात एक लाख म्हशी आणि गाई असल्याची माहिती मुंबई दूध उत्पादक संघाने दिली आहे. या ताज्या सुट्या दूध उत्पादन व्यवसायावर बारा हजार लोक  अवलंबून आहेत. 


या आधी अमूलने त्यांच्या दुधाच्या किमतीमध्ये वाढ केली होती. अमूल दुधाच्या नवीन किमती 17 ऑगस्टपासून लागू झाल्या आहेत. अमूल ब्रँड अंतर्गत येणाऱ्या अमूल गोल्ड, अमूल शक्ती आणि अमूल ताजा यांच्या किमतीत वाढ करण्यात आली. याचा अर्थ अमूल गोल्ड 62 रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती 56 रुपये प्रति लीटर आणि अमूल ताजाचा दर 50 रुपये प्रति लिटर होईल. तर अर्धा लीटर अमूल गोल्ड 31 रुपये आणि अमूल ताजा 25 रुपयांना तर अमूल शक्तीचा दर 28 रुपये असेल.


अमूलनंतर मदर डेअरीनेदेखील दुधाच्या किमतीत दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. 


महागाईचा भडका


एकीकडे दूध महागलं असताना आता दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा हा फराळही महागणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोहे, भाजके पोहे, दगडी पोहे, पातळ पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या तीन महिन्यांत पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाली असून ही तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.