Ashwin 2022 : आश्विन महिना (Ashwin 2022) सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिना हा सर्वात महत्वाचा महिना आहे. कारण याच महिन्यात नवरात्र, दसरा आणि दिवाळी (Diwali 2022) हे मोठे सण साजरे केले जातात. या महिन्यात सर्वात जास्त आकर्षण असतं ते दिवाळीचं. मात्र, या व्यतिरिक्तही आश्विन महिन्यात अनेक महत्वाचे दिवस साजरे केले जातात. याच महत्वाच्या दिवसांची, सणांची माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत. 



26 सप्टेंबर : घटस्थापना





चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाच्या उत्सवांपैकी शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाची मानली जाते. पहिल्या दिवशी म्हणजेच आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून नऊ दिवस देवीचे पूजन, भजन, कीर्तन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. यंदा सोमवार, 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापना होणार आहे. नवरात्रात केलेले देवीपूजन विशेष लाभदायक, पुण्य, शुभ फलदायक असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात देवीचा उत्सव फार मोठा आहे. नवरात्रात नऊ दिवस विविध देवींची पूजा केली जाते. जसा गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी फार प्रसिद्ध आहे. तसाच महाराष्ट्रात लोक वेगवेगळ्या प्रकारचा उपवास करतात. जसे की, अनवाणी चालणे, नऊ दिवसांचा उपवास करणे, निर्जल उपवास करणे इ.. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा नवरात्रीत उपवास करतात. 


त्याचप्रमाणे देवीची साडेतीन शक्तीदूतं महाराष्ट्रात आहेत. यामध्ये अंबाबाई, वणीची सप्तश्रुंगी, तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका या देवींचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाचं फार महत्त्व आहे. 


तसेच, नवरात्रात महाराष्ट्रात घटस्थापना ही रबी पिकाची सुरुवात देखील समजली जाते. घटस्थापना हे बीजपरीक्षण आहे.


29 सप्टेंबर : विनायक चतुर्थी





विनायक चतुर्थी व्रत-श्रावण कृष्ण चतुर्थी ह्या तिथीला गणेशाची ‘विनायक’ ह्या नावाने पूजा करावी. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. श्रीगणेशाची संकष्ट चतुर्थीला करतात तशी यथाविधी पूजा करावी. चंद्रोदयानंतर गणेशाला लाडवांचा नैवैद्य दाखवावा. पूजेनंतर लाडवांचेच दान द्यावे. सर्व दु:ख-संकटांचा परिहार होऊन सुखसमृद्धी लाभावी म्हणून हे व्रत करतात. युधिष्ठिराने हे व्रत केले होते.

3 ऑक्टोबर : दुर्गाष्टमी




दुर्गाष्टमी हा बंगाली लोकांचा प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो. जसा महाराष्ट्रात अकरा दिवस गणेशोत्सवाचा सण साजरा केला जातो. तसंच बंगालमध्ये दहा दिवस दूर्गापूजा म्हणून प्रसिद्ध आहे. देव आणि पृथ्वीवासियांना हैराण करून सोडलेल्या महीषासुर राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार घेतलेल्या दुर्गेने त्याच्याशी सतत आठ दिवस युद्ध करून त्याला ठार केले तो दिवस दुर्गाष्टमी म्हणून साजरा करण्याची भारतात प्रथा आहे. या दिवशी दुर्गेबरोबरच तिच्या शस्त्रांचीही पूजा करण्याची पद्धत बंगाली लोकांमध्ये आहे.

5 ऑक्टोबर : दसरा, विजयादशमी





आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील ही दशमी श्रवण नक्षत्राच्या योगावर ‘विजयादशमी’ साजरी होते. ह्या दशमीलाच ‘दसरा’ म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. यामध्ये अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडवा असे साडेतीन मुहूर्त आहेत. कार्तिकचा पहिला दिवस हा गुढीपाडवा असतो. दसऱ्याला शेतीतील पहिले पीक वाजतगाजत घरी आणून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही गावोगावी पाळली जाते. ह्या नव्या धान्याच्या काही लोंब्या, झेंडूची फुले आणि आंब्याची पाने ह्यांनी बनविलेल्या तोरणात बांधतात. हे सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. ह्या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितादेवीची पूजा आणि शस्त्रपूजा हे चार विधी पूर्वी राजे रजवाडे, सरदार करीत असत.


9 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा



अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. रविवार, 09 ऑक्टोबर रोजी पहाटे 03:41 वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी सोमवार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 02:24 वाजता समाप्त होईल.
पण, हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोजागिरीत चंद्र पाहून दूध पिण्याची विशेष परंपरा भारतात आहे.



9 ऑक्टोबर - महर्षी वाल्मिकी जयंती


महर्षी वाल्मिकी ऋषी यांना संस्कृत भाषेचे पहिले कवी मानले जाते. परंतू जयंती हिंदू चंद्र पंचागाच्यामते आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.



9 ऑक्टोबर : नवान्न पौर्णिमा


आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. "नवान्न पौर्णिमा" कोकणात निसर्गाविषयीच्या कृतज्ञेपोटी नवान्न पौर्णिमा साजरी होते. नवीन आलेलं धान्य हीच शेतक-यांची लक्ष्मी. आजच्या दिवशी शुचिर्भूत होऊन शेतातील नवीन भात, वरी, नाचणी यांच्या लोंब्या कापून आणून तुळशी वृंदावना समोर पाटावर ठेवतात. पाटाभोवती व घरापुढे रांगोळी काढतात. नवीन भाताची खीर किंवा नवीन भाताच्या पिठाचे "पातोळे"याचा गोड नैवेद्य देवाला दाखवतात.



13 ऑक्टोबर - संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08.16)


आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते. यंदा संकष्टी चतुर्थी गुरुवारीर, 13 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. या वेळी चंद्रयोग 08.16 आहे.


13 ऑक्टोबर : करवा चौथ व्रत 




कोजागिरी नंतरची चतुर्थी म्हणजेच करवा चौथ. आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिला दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथचे (Karwa Chauth 2022) व्रत करतात. यावर्षी करवा चौथचे व्रत 13 ऑक्टोबर 2022 रोजी गुरुवारी केले जाणार आहे. असे मानले जाते की, या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. करवा चौथला गणेशाची, शंकर-पार्वती, करवा माता याशिवाय चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी, पतीच्या संरक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडतात. 


21 ऑक्टोबर : वसुबारस



दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस. वसुबारसला 'गोवत्स द्वादशी' असे देखील म्हणतात. यामध्ये जनावरांची पूजा केली जाते.   यावर्षीची दिवाळीची सुरुवात खरंतर 21 ऑक्टोबर वसुबारसने होते. गाय आणि तिचे वासरु हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक मानले जाते. गाय वासरावर जे प्रेम करते ते केवळ अनुपमेय असे असते, तसेच वत्साचे गायीवरचे प्रेम हे अनन्यसाधारण असते. म्हणून देव-भक्त, आई-मूल, गुरु-शिष्य यामधील प्रेमसंबंधालाही आपली संतमंडळी नेहमी गाय-वासराच्या प्रेमाची उपमा देतात.


23 ऑक्टोबर : धनत्रयोदशी


आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीमध्ये धनाजी पूजा होते आणि धन्वंतरी ऋषी जे आयुर्वेदाचे जनक आहेत. जे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. ते या दिवशी धन्वंतरी ऋषींची पूजा करतात. बाकी व्यापारी आणि इतर लोक हे धनाची पूजा करतात. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश ‘धनतेरस’ असा आहे. हिंदू धर्मात हा शुभ दिवस मानला जातो. 


24 ऑक्टोबर (सोमवार) : नरक चतुर्दशी


नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ही तिथी ‘नरकचतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल, असे सांगितले. ह्या दिवशी संध्याकाळी समईच्या चार वाती प्रज्वलित करुन पूर्वाभिमुख होऊन ती तेवती समयी दानात देण्याची प्रथा काही मंडळी आजही पाळतात. तसेच, कोकणात अंघोळ केल्यानंतर 'कारेटं' अंगठयाने फोडण्याची प्रथा आजही पाळली जाते. नरकासुराच्या वधाचे ते प्रतीक आहे असे मानतात. यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आले आहेत. खरंतर लक्ष्मीपूजन हे दुसऱ्या दिवशी येते.


24 ऑक्टोबर (सोमवार) :  लक्ष्मीपूजन






दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची पूजा मानली जाते. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करून, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते.


महत्वाच्या बातम्या : 


Bhadrapada 2022 : भाद्रपद महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?