Navratri 2022 : नवरात्रोत्सव (Navratri 2022) म्हणजे नऊ दिवसांत देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करण्याचा उत्सव. या नऊ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीने दुर्गामातेची पूजा केली जाते. गेली दोन वर्ष कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सगळ्याच सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा सणांचा जल्लोष सुरु झाला आहे. नवरात्री आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यावर्षी पुन्हा एकदा सगळीकडे गरबा आणि दांडियांचा सूर ऐकू येणार आहे. गरब्यासोबतच नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांचे दर्शन घेण्याची देखील एक प्रथा आहे. अनेक स्त्रिया या नऊ दिवसांत वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेतात. आपल्या महाराष्ट्रात देखील काही प्रसिद्ध देवी मंदिरं आहेत, जिथे केवळ नवरात्रच नव्हे तर, देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण वर्ष गर्दी असते. चला जाणून घेऊया अशाच काही मंदिरांबद्दल...


कोल्हापूरची अंबाबाई


कोल्हापूरमधील अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. देवीच्या शक्तीपीठांपैकी एक असे हे मंदिर आहे. कोल्हापूरचे हे अंबाबाई देवीचे मंदिर ‘दक्षिणेची काशी’ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिरात नवग्रह, भगवान सूर्य, महिषासुर मर्धिनी, विठ्ठल रखमाई, शिवाजी, विष्णू, तुळजा भवानी इत्यादी देवतांचीही पूजा केली जाते. या मंदिरात स्थापित असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती सुमारे 7 हजार वर्षे जुनी असल्याचे मानले जाते.  


सोलापूरची ‘तुळजाभवानी’


सोलापूरात तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून, नवरात्रीच्या काळात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता म्हणून देखील या देवीची ओळख आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर परदेशातूनही लोक इथे दर्शनासाठी येतात.


नाशिकची ‘सप्तशृंगी’


महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तशृंगी देवी मंदिर 4800 फूट उंच सप्तशृंग पर्वतावर आहे. नाशिकपासून हे शक्तीपीठ सुमारे 60 किलोमीटर अंतरावर विराजमान आहे. सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली होती. पुरण कथेनुसार महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञातून देवी प्रगट झाली व देवीने महिषासुराचा वध केला होता.


मुंबईची ‘मुंबा देवी’


‘मुंबा’ देवीच्या मंदिरामुळेच स्वप्नांच्या या शहराला ‘मुंबई’ असे नाव पडले आहे. मुंबा देवीचे मंदिर मुंबईतील भुलेश्वर येथे आहे. मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांची माऊली अशी ‘मुंबा’ देवीची ओळख. केवळ नवरात्रच नव्हे तर, वर्षाच्या बाराही महिने या मंदिरात भाविकांची गर्दी असते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी मुंबा देवीच्या देवळाचे स्थान बदलले आणि ते भुलेश्वर येथे स्थापित केले. मुंबादेवीच्या मंदिरात अन्नपूर्णा आणि जगदंबादेवीच्या मूर्ती देखील आहेत.


लोणावळ्याची ‘एकवीरा देवी’


लोणावळ्यापासून 8 किमी अंतरावर असलेले ‘एकवीरा देवी’ मंदिर हे कार्ला लेण्यांजवळ असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. या मंदिरात ऋषी परशुरामाची आई म्हणून देवी एकवीरेची पूजा केली जाते. हे मंदिर एका टेकडीवर वसलेले आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 500 पायऱ्या चढून जावे लागते. पौराणिक कथांनुसार पांडवांना एकवीरा देवीकडून वरदान मिळाले होते. पांडवकाळात या मंदिराचे निर्माण झाल्याचेही म्हटले जाते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :