IPL 2023 Auction : कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) पूर्वीप्रमाणे होत नसल्याचं दिसून आलं आहे. पण आता आगामी आयपीएल 2023 (IPl 2023) अगदी दमदाररित्या पार पडणार अशी दाट शक्यता असल्याने क्रिकेटचाहते या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान आयपीएल 2023 चा लिलाव (IPL 2023 Auction) येत्या डिसेंबरमध्ये पार पडण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकी तारीख अजून समोर आली नसली तरी बीसीसीआयनं सर्व संघाशी एका तात्पुरत्या वेळापत्रकाची चर्चा केली आहे. 


आयपीएल 2022 साठी महालिलाव पाहायला मिळाला. आधी 8 संघ असताना लखनौ आणि गुजरात या नव्या संघाच्या आयपीएलमध्ये एन्ट्रीमुळे सर्वच संघामध्ये बरेच बदल झाले. नुकताच महालिलाव पार पडल्याने आगामी आयपीएल 2023 चा लिलाव हा अधिक मोठा नसणार आहे. पण तरीदेखील आयपीएल 2022 नंतर आगामी आयपीएलमध्ये काही मोठे बदल होऊ शकतात. चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हा संघ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच इतरही काही मोठे खेळाडू संघबदल करु शकतात. त्यामुळे हा लिलाव पाहण्याजोगा असू शकतो.


आयपीएल पुन्हा Home Away Format मध्ये


आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसंबधित बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguy) याने काही दिवसांपूर्वीच एक नवी घोषणा केली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली असून तो म्हणाला, ''मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल पुन्हा जुन्या ढंगात होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे.'' टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ''पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. तसंच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे. आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.”  


हे देखील वाचा-