Important days in 11th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 11 एप्रिलचे दिनविशेष. 


1827 : श्रेष्ठ समाजसुधारक, क्रांतिकारक, विचारवंत महात्मा जोतिराव फुले यांचा जन्म. 


महात्मा जोतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले.
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 


1869 : कस्तुरबा गांधी यांचा जन्म. 
कस्तुरबा मोहनदास गांधी या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने 'बा' असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. 1906 साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला आणि सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या.


सन 1904 साली गायक कुंदनलाल सैगल यांचा जन्मदिन.


कुंदनलाल सैगल हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटातील सर्वात लोकप्रिय गायक, अभिनेते होते. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉईस’म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. गझल, भजने, ठुमरी, अंगाई गीत, बालगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी सहजतेने आणि सफाईने गायिली. 


1919 : इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.


आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था जगातील कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करते. या संस्थेची स्थापना 1919 मध्ये झाली. संस्थेची रचना त्रिस्तरीय आहे. यामध्ये सरकार, नियुक्त सदस्य आणि कामगार यांचे प्रतिनिधित्व असते.


1951 : अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांचा जन्म.


रोहिणी जयदेव हट्टंगडी या रंगभूमीवरील आणि चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा'च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगभरात पोहोचल्या. आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील त्यांची भूमिकाही खूप लोकप्रिय ठरली. त्यांनी मराठी बरोबरच अनेक हिंदी, तमिळ, कानडी, तेलुगु चित्रपटांत काम केले आहे. 


1976 :  ॲपल कंपनीचे ॲपल 1 हे संगणक तयार झाले.


ॲपल एक अमेरिकी बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. ॲपलची स्थापना स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोजनियाक आणि रोनाल्ड वेन यांनी एप्रिल 1976 मध्ये केली होती आणि वझ्नियाकच्या ॲपल आय पर्सनल कम्प्युटरची विक्री केली. 


1992 : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.


भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचा जन्म 3 मे 1898 रोजी कोल्हापुरात झाला. भालजी पेंढारकरांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानासाठी अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले. यामध्ये ‘तांबडी माती’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद या विभागात राष्ट्रीय पारितोषिक, चित्रभूषणजीवन गौरव, ग.दि.मा. पुरस्कार, तसेच 1991 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, तमिळ अशा बहुभाषिक चित्रपटांची निर्मिती भालजींनी केली आहे. 


1999 : अग्नी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.


ओडिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-2 या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे. इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स 4 मधून मोबाईल लॉंचरच्या माध्यमातून अग्नी-2 ची चाचणी घेण्यात आली. अग्नी-2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी-2 चा माऱ्याचा पल्ला दोन हजार कि.मी इतका आहे.


2009 : भारतीय लेखक आणि नाटककार विष्णु प्रभाकर यांचे निधन. 


सन 2009 साली पद्मभूषण आणि साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी भाषिक कादंबरीकार आणि लेखक विष्णू प्रभाकर यांचे निधन झाले. विष्णू प्रभाकर हे एक प्रसिद्ध हिंदी लेखक होते ज्यांनी अनेक लघुकथा, कादंबरी, नाटके आणि प्रवासवर्णन लिहिले.  देशभक्ती, राष्ट्रवाद आणि सामाजिक विकास हे त्यांच्या कामातील मुख्य अभिव्यक्ती होत्या. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha