Important days in 10th April : एप्रिल महिना सुरु होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 10 एप्रिलचे दिनविशेष. 


1755 : होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमान यांचा जन्म. 


सॅम्युअल हानेमन यांना होमियोपॅथी उपचार पद्धतीचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 या दिवशी झाला. म्हणूनच 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो.


1875 : स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.


आधुनिक भारताचे महान समाजसुधारक महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईत 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाज स्थापन केला. स्वामी दयानंद यांचा जन्म मोरवी संस्थानातल्या एका खेड्यात 1824 मध्ये झाला. त्यांनी आपल्या हयातीत आपले मूळ नाव अथवा जन्मस्थान कधीही कोणास सांगितले नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी मूर्तिपूजेविरुद्ध बंड केले. 


1894 : बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म.


कॅश फ्लो (Cash Flow) म्हणजेच पैशांचा प्रवाह हे तंत्र उद्योग धंद्यामध्ये वापरले जाते. याच तंत्राचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग करुन भारतातील एका उद्योग समूहाने स्वतःचा प्रचंड विकास करुन घेतला आहे. हा उद्योग म्हणजेच बिर्ला समूह उद्योग. या बिर्ला उद्योग समूहाचे घनश्यामदास बिर्ला हे संस्थापक होते. 


1901 : अर्थशास्त्रज्ञ, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ यांचा जन्म. 


डॉ.गाडगीळ भारतातील सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते मानले जातात. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने आणि सहकारी बँका वाढीस लावण्याचे श्रेय त्यांना आहे. भारताच्या अर्थकारणाचा, विशेषतः कृषिविषयक जटिल समस्यांचा, सखोल अभ्यास करून त्यांनी आपले मूलग्राही विचार अनेक ग्रंथांतून आणि लेखांतून मांडले. 


1907 : नाटककार, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार मो. ग. रांगणेकर यांचा जन्म. 


मोतीराम गजानन रांगणेकर हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. 1982 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले. इ.स. 1968 साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या 49व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


1912 : जगप्रसिद्ध टायटॅनिक बोटीचा पहिला प्रवास सुरु.


1912 मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक (इंग्लिश: RMS Titanic) हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले. चार दिवसांनी 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले. एकूण 2,227 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी 1,517 लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो. 
टायटॅनिक जहाजाच्या डिझाईन आणि बांधणीमध्ये अनेक अनुभवी अभियंत्यांचा सहभाग होता. त्याच्या बांधणीसाठी त्या काळातील सर्वात अद्ययावत उत्पादन तंत्रे वापरण्यात आलेली होती. तसेच ह्या जहाजामध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करण्यात आला होता. असे असतानाही हे जहाज पहिल्याच सफरीमध्ये बुडाले ह्यामुळे अनेक तज्ज्ञांना धक्का बसला.


1931 : शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा जन्म.


किशोरीताई आमोणकर ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या आणि आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जात असे. किशोरीताईंनी इ.स. 1950 चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' (इ.स. 1964) साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. इ.स. 1991 मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करतात. किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ’गानसरस्वती महोत्सव’नावाचा गायन-वादन-नृत्य असा तीन दिवसांचा संगीताचा कार्यक्रम होतो.


1952 : योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.


पहिली पद्धत जोन्स साल्क यांनी 1952 साली यशस्वीरीत्या शोधून काढली. या पद्धतीत लस म्हणजे मेलेल्या जीवाणूंचा संच वापरला गेला. हे जीवाणू शरीरात स्नायूंमार्फत टोचून दिले जात. 


1952 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन्म.


नारायण राणे हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. 1 फेब्रुवारी, इ.स. 1999 ते 17 ऑक्टोबर, इ.स. 1999 या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. 2005 पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात होते, 2019 मध्ये ते भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षा मध्ये गेले. 1 ऑक्टोबर 2017 रोजी सर्व पक्षांमधून बाहेर पडून 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली.


1965 : स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन.


पंजाबराव देशमुख (जन्म : पापळ-अमरावती जिल्हा, 27 डिसेंबर 1898; - दिल्ली, 10 एप्रिल 1965) यांचा जन्म पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. 1936 च्या निवडणुकीपश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे एक हजारच्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत. 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.


1995 : भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे निधन. 


मोरारजी रणछोडजी देसाई (29 फेब्रुवारी 1896 - 10 एप्रिल 1995) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते 1977 ते 1979 दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे चौथे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री आणि अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. 1974 मध्ये भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर देसाई यांनी चीन आणि पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध परत आणण्यास मदत केली आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धासारख्या सशस्त्र संघर्ष टाळण्याचा संकल्प केला. 19 मे 1990 रोजी त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, निशान-ए-पाकिस्तानने गौरविण्यात आले. भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये वयाच्या 84 व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती होते. 


2022 : उद्यापासून देशभरात बूस्टर डोसला सुरुवात.


देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून कोविड वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha