IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या वीसाव्या सामन्यात राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली.


नाणेफेक गमवल्यानंतर राजस्थानकडून मैदानात उतरलेल्या जॉस बटलर आणि देवदत्त पडीकलनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या चार चषकात राजस्थाननं 39 धावा केल्या. मात्र, पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर आवेश खाननं जॉस बटलरच्या रुपात राजस्थानच्या संघाला पहिला झटका दिला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसननं त्याची विकेट्स गमावली. त्यानं 12 चेंडूत 13 धावा केल्या. त्यानंतर शिमरॉन हेटमायरनं आणि आर. अश्विननं तडाखेबाज फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला. हेटमायरनं 36 चेंडूत 59 धावा केल्या. तर, अश्विननं 23 चेंडूत 28 धावा केल्या. ज्यामुळं राजस्थाननं लखनौसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं. लखनौकडून होल्डर आणि कृष्णप्पा गौथम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, आवेश खाननं एक विकेट्स मिळवली.


राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं पहिल्याच षटकात चेंडू ट्रेन्ट बोल्टच्या हातात देऊन लखनौच्या संघाला दोन मोठे झटके दिले. ट्रेन्ट बोल्टनं पहिल्याच षटकात लखौनचा कर्णधार केएल राहुल आणि कृष्णप्पा गौथमला माघारी धाडलं. लखनौनं दोन विकेट्स गमावल्यानंतर राजस्थानच्या संघावर दबाव टाकण्यासाठी जेसन होल्डरला मैदानात पाठवण्यात आलं होतं. मात्र, संघाचा डाव पुढे घेऊन जाण्यास तो अपयशी ठरला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर त्यानं आपली विकेट्स गमावली. 


सामना राजस्थानच्या बाजूनं झुकलेला असताना क्विंटन डी कॉकनं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. परंतु, त्यालाही लखनौच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. तो चहलच्या गोलंदाजीवर आऊट झाला.  या सामन्यात त्यानं 31 चेंडूत 39 धावा केल्या आहेत. त्याच्या आऊट झाल्यानं पुन्हा राजस्थानच्या संघानं सामन्यावर कब्जा केला. दरम्यान, आठराव्या षटकात संजू सॅमसननं युजवेंद्र चहलकडं चेंडू सोपावला. ही षटक दोन्ही संघासाठी महत्वाची होती. या षटकात युजवेंद्र चहलनं 15 धावा दिल्या. ज्यामुळं लखनौला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 34 धावा शिल्लक राहिल्या. 


लखनौच्या संघाला अखेरच्या षटकात पंधरा धावांची गरज असताना राजस्थानचा युवा गोलंदाज कुलदीप सैन गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याच्यासमोर मार्कस स्टॉयनिसचं मोठं आव्हान होतं. परंतु, त्यानं पहिल्या चेंडूवर एक धाव देऊन त्यानंतचे तीन चेंडू निर्धाव टाकत सामना राजस्थानच्या बाजून झुकवला.