Yoga Day 2022 : आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज योगा (Yoga Day) करणे खूप आवश्यक आहे. योगा केल्याने शरीर तर तंदुरुस्त राहतेच. पण, त्यासोबतच मन देखील स्थिर राहते. यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात बराच फायदा होतो. मात्र, योग्य पद्धतीने योगा करण्यासोबतच संतुलित आहार देखील आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. केवळ निरोगी आणि संतुलित आहार घेतल्यानेच योगाचे पूर्ण फायदे मिळतात.


मात्र, योगासने करण्यापूर्वी आणि केल्यानंतर नेमके काय खावे याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत. काही लोक असे म्हणतात की, योगासन करण्यापूर्वी आणि वेळासाठी नंतरही रिकाम्या पोटी राहणे फायदेशीर असल्याचे मानतात. तर, काही लोकांचे या विषयावर वेगळे मत आहे. योगा करण्यापूर्वी आणि योगा केल्यानंतर पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे काहींचे म्हणणे आहे. 21 जूनला जगभरात ‘योगा दिवस’ साजरा केला जातो. याच निमित्ताने जाणून घेऊया योगा करण्यापूर्वी आणि नंतर काय खाल्ले पाहिजे...


योगा करण्यापूर्वी काय खावे?


सकाळी योगा सुरू करण्यापूर्वी थोडेसे पाणी प्या, म्हणजेच रिकाम्या पोटी पाणी प्यावे. योगासने करताना तहान लागल्यास थोडे थोडे पाणी प्या. योगासन करताना शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योगा करताना शरीरातून घाम येतो. घाम वाटे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. तसेच, पाणी चयापचय वाढवण्याचे काम करते.


योगा करण्याच्या किमान 45 मिनिटे आधी केळी, सफरचंद आणि बेरी सारखी इतर फळे खाऊ शकतात. या शिवाय दही, ड्रायफ्रुट्स, ज्यूस, अंडी, होममेड प्रोटीन बार आणि प्रोटीन शेक यांसारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांनीही दिवसाची सुरुवात करू शकता.


योगा केल्यानंतर काय खावे?


योगा केल्यानंतर किमान 30 मिनिटांनी ग्लासभर पाणी प्यावे. योगा केल्यानंतर पौष्टिक आहार घ्यावा. ज्यामध्ये हंगामी फळे किंवा भाज्यांची कोशिंबीर खाऊ शकता. याशिवाय, नाश्त्यात उकडलेली अंडी, सँडविच, ड्रायफ्रुट्स, दही आणि स्प्राउट्स खाऊ शकता. पण, जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर योगा करण्याच्या किमान एक तास आधी हलका नाश्ता घ्यावा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा:


International Yoga Day 2022 : योग म्हणजे काय? जाणून घ्या योगाचे फायदे आणि प्रकार


Yoga Day 2022 : सतत चिडचिड होते? हे योगासनं करा अन् रागावर नियंत्रण मिळवा