Nashik Maharashtra Police Academy : नाशिकमधील (Nashik) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा (Maharashtra Police Academy) दीक्षांत संचलन सोहळा पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या उपस्थितीत पार पडला. परीक्षा, मेहनत अन आता सेवेत दाखल झाल्याने प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी सिन्नरचा (Sinnar) राजू सांगळे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पुरस्काराचा मानकरी ठरला.


सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये पोलीस दलाकडून जनतेच्या आणि सरकार यांच्या अपेक्षा वाढत आहेत. नवी आव्हाने समोर येत आहेत. तेव्हा या सगळ्यासाठी तयार रहा असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी केले आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.121 च्या दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. 


दरम्यान प्रबोधिनीमध्ये अतिशय खडतर प्रवासातून या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापुढे ही नवनवीन गोष्टी आत्मसात करून ज्ञानात भर घालावी. नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करत जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडावी असे आवाहन शेठ यांनी यावेळी केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी संचलन केले. जवळपास 160 पुरूष 11 महिला असे एकूण 171 नव्याने रुजू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश यामध्ये आहे. प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहभागी होत असलेल्या प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


सदर 171 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण 02 ऑगस्ट 2021 पासून प्रशिक्षण सुरू झाले होते. 10 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी पूर्ण केले. या प्रशिक्षणार्थींपैकीं 68 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर व पदव्युत्तर आहेत. या काळात भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया, भारतीय पुरावा कायदा स्थानिक आणि विशेष कायदे यांची माहिती घेतली. फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र, बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार सराव असे प्रशिक्षण पूर्ण केले आहेत.


सिन्नरच्या राजू सांगळेला उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार
महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र.121 च्या दीक्षांत संचलन समारंभात 171 अधिकारी पोलीस दलात दाखल झाले. सिन्नर येथील राजू सांगळे यास उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार देण्यात आला. तर सोलापूरची उर्मिला खोत बेस्ट ऑलराउंडर कॅडेंट म्हणून पुरस्कार मिळाला. तर सुजित पाटील दुसरा बेस्ट स्टडीज कॅडेंट म्हणून निवड झाली.