XE Variant of Coronavirus : देशात सध्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाली आहे. दररोज देशात एक हजारांहून कमी प्रकरणं नोंदवली जात आहेत. त्यानंतर दोन वर्षांनंतर देशातील कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध संपले आहेत. तरीही फेस मास्क वापरणं आवश्यक आहे. कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येत कोरोनाच्या XE या नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. मुंबईतील दक्षिण आफ्रिकन वंशाच्या एका महिलेला XE व्हेरियंटची लागण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आला आहे. तर, वैज्ञानिकांना अद्याप याविषयी कोणतेही सबळ पुरावे मिळाले नसल्यामुळं केंद्रानं मुंबई महापालिकेचा हा दावा फेटाळला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट XE ची पहिली केस ब्रिटनमध्ये आढळून आली आहे. जाणून घ्या कोरोनाचा XE प्रकार काय आहे? तो कितपत धोकादायक आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत, याबाबत सविस्तर...
मुंबईतील महिलेला XE व्हेरियंटची लागण?
बुधवारी बीएमसीने मुंबईत एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. एक्सई व्हेरीयंट रुग्ण महिला मूळची दक्षिण आफ्रिकन असून वय वर्ष 50, दोन्ही लसीचे डोस पूर्ण सोबतच कोणतीही लक्षणं नव्हती. एक्सई व्हेरीयंट रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून 10 फेब्रुवारी रोजी भारतात आली होती. लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. भारतात आल्यावर रुग्ण निगेटिव्ह होता मात्र दोन मार्च रोजी रुटिन टेस्ट केल्यावर कोव्हिड पॉझिटिव्ह आढळली. अशात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी रुग्णाची चाचणी केल्यानंतर रुग्ण निगेटिव्ह आली होती.
कोरोनाच्या XE प्रकाराचा भारतात डेल्टासारखा परिणाम होण्याची शक्यता नाही
WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की कोरोनाच्या XE प्रकाराचा भारतात डेल्टासारखा परिणाम होण्याची शक्यता नाही. भारतातील बहुतेक लोकांचं कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. नवीन प्रकारासंबंधीच्या प्राथमिक माहितीच्या आधारे, असे म्हटले जात आहे की ते इतर प्रकारांपेक्षा 10% जास्त संसर्गजन्य आहे. म्हणजेच त्याचा प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे की, आम्ही अजूनही XE प्रकाराचा बारकाईने अभ्यास करत आहोत आणि अधिक माहिती घेत आहोत. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही. कारण यामुळं रुग्ण जास्त गंभीर होत नाही. ज्यांचं लसीकरण करण्यात आले आहे त्यांना सुरुवातीची कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत, असं स्वामिनाथन यांनी स्पष्ट केलं आहे.
XE व्हेरियंट कितपत धोकादायक?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, नवीन XE प्रकार प्रथम युनायटेड किंगडम (यूके) मध्ये 19 जानेवारी रोजी आढळला आणि तेव्हापासून शेकडो तपासण्या करण्यात आल्या आहेत. हे दोन व्हेरियंट ओमायक्रॉनची इतर रूपं ba.1 आणि ba.2 चं म्यूटेंट हायब्रिड आहे. WHO ने म्हटलं आहे की, नवीन म्यूटेंट Omicron च्या ba.2 सब-व्हेरियंटपेक्षा सुमारे 10 टक्के अधिक संक्रमणक्षम आहे. जे कोणत्याही प्रकारच्या स्ट्रेनपेक्षा जास्त संक्रमणीय असू शकतं.
कोरोना व्हेरियंटच्या नव्या व्हेरियंटमुळे आरोग्य वर्तुळात चिंता वाढली आहे. कारण महाराष्ट्र सध्या रिकव्हरी ट्रॅकवर आहे आणि डिसेंबर 2021 मध्ये सुरू झालेली राज्यातील तिसरी लाट अंतिम टप्प्यात आहे. जरी सध्या जगभरात XE चे काही रुग्ण आढळून आले आहेत.
XE व्हेरियंटची लक्षणं काय?
यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या मते, XE व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये नाक वाहनं, शिंका येणं आणि घशात खवखव होणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. जे विषाणूच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगळे आहेत. कारण मूळ स्ट्रेनमध्ये रुग्णात ताप आणि खोकला यांसारख्या तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच, या व्हेरियंटमध्येही इतर व्हेरियंटप्रमाणे चव लागत नाही. तसेच, कोणताही गंध येत नाही. 22 मार्चपर्यंत इंग्लंडमध्ये एक्सईची लागण झालेल्या 637 रुग्ण आढळून आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus New XE Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा भारताला किती धोका?; रवी गोडसेंची XEची बद्दल महत्वाची माहिती
- Corona XE Variant : मुंबईत कोरोनाचा नवा व्हेरियंट; WHOकडून दिलासा देणारी माहिती
- Coronavirus : धोका वाढतोय? मुंबईत आढळले कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण
- बीएमसी म्हणतेय, मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळला, पण केंद्राचा नकार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha