Mumbai Coronavirus New Variant : मुंबईत कोरोनाचा XE व्हेरियंट आढळल्याचं वृत्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळले आहे. बुधवारी मुंबई कोरोनाचा XE व्हेरियंट आढळल्याचं बीएमसीकडून (Brihanmumbai Municipal Corporation) सांगण्यात आले होते. 


बुधवारी बीएमसीने मुंबईत एक्सई व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. एक्सई व्हेरीयंट रुग्ण महिला मूळची दक्षिण आफ्रिकन असून वय वर्ष 50, दोन्ही लसीचे डोस पूर्ण सोबतच कोणतेही सिम्प्टम्स नव्हते. एक्सई व्हेरीयंट रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून 10 फेब्रुवारी रोजी भारतात आली होती. लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. भारतात आल्यावर रुग्ण निगेटिव्ह होता मात्र दोन मार्च रोजी रुटिन टेस्ट केल्यावर कोव्हिड पॉझिटिव्ह आढळली. अशात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी रुग्णाची चाचणी केल्यानंतर रुग्ण निगेटिव्ह आली.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबईत ओमायक्रॉनचा उप प्रकार 'XE' आढलल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. मुंबईत कोव्हिड एक्सई व्हेरीयंटच्या नोंदवलेल्या प्रकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण. पुरावे नव्या प्रकारचा व्हेरीयंट असल्याचं स्पष्ट करत नाही-केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.  नमुन्याच्या संदर्भात फास्टक्यू फाईल्स, ज्याला 'XE' व्हेरियंट असल्याचे सांगितले जात आहे, त्यांचे INSACOG च्या जीनोमिक तज्ञांनी तपशीलवार विश्लेषण केले आहे. यात निष्कर्ष असा निघाला आहे की, या प्रकाराची जीनोमिक रचना 'XE' प्रकाराच्या जीनोमिक चित्राशी संबंधित नाही, असे आरोग्य मंत्रालयातील अधिकृत सुत्रांनी माहिती दिली. 


दरम्यान,मुंबईत एकूण 230 नमुन्यांमध्ये  ‘ओमायक्रॉन’चे 228 रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात दाखल २१ पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही, असेही समोर आले. कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱया चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  केल्या जात आहेत. या अंतर्गत अकराव्या तुकडीमध्ये मुंबईतील 230 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. 


सदर 230 रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.
• 0 ते 20 वर्षे वयोगट  - 31 रुग्ण (13 टक्के)  
• 21 ते 40 वर्षे वयोगट – 95 रुग्ण (41 टक्के)
• 41 ते 60 वर्षे वयोगट - 72 रूग्ण (31 टक्के)
• 61 ते 80 वयोगट - 29 रुग्ण (13 टक्के)
• 81 ते 100 वयोगट - 3 रुग्ण (1 टक्के)


पहिला डोस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. तर दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी फक्त 9 जण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लसीचा एकही डोस न घेतलेले 12 जण रुग्णालयात दाखल झाले. तर एकूण 230 संकलित नमुन्यांपैकी फक्त एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. मात्र सदर मृत रुग्णाचा पोटाशी संबंधित विकारामुळे मृत्यू झाला असल्याने त्याची कोविड-इतर मृत्यू (Covid Other death) अशी नोंद करण्यात आली आहे.  सदर मृत रुग्णाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.