Mumbai Coronavirus New Variant : कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध उठवले आहेत. पण मुंबईतून चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. मुंबईत कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहेत. मुंबईत `कापा´ आणि `एक्सई´ उपप्रकाराचे रुग्ण सापडले आहेत. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) अंतर्गत अकराव्या चाचणीमध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.
मुंबईत एकूण 230 नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’चे 228 रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात दाखल २१ पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही, असेही समोर आले. कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱया चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केल्या जात आहेत. या अंतर्गत अकराव्या तुकडीमध्ये मुंबईतील 230 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.
सदर 230 रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.
• 0 ते 20 वर्षे वयोगट - 31 रुग्ण (13 टक्के)
• 21 ते 40 वर्षे वयोगट – 95 रुग्ण (41 टक्के)
• 41 ते 60 वर्षे वयोगट - 72 रूग्ण (31 टक्के)
• 61 ते 80 वयोगट - 29 रुग्ण (13 टक्के)
• 81 ते 100 वयोगट - 3 रुग्ण (1 टक्के)
पहिला डोस घेतलेल्यांपैकी कोणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. तर दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी फक्त 9 जण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लसीचा एकही डोस न घेतलेले 12 जण रुग्णालयात दाखल झाले. तर एकूण 230 संकलित नमुन्यांपैकी फक्त एका बाधित महिलेचा मृत्यू झाला. मात्र सदर मृत रुग्णाचा पोटाशी संबंधित विकारामुळे मृत्यू झाला असल्याने त्याची कोविड-इतर मृत्यू (Covid Other death) अशी नोंद करण्यात आली आहे. सदर मृत रुग्णाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते.