मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फ्रिजमधील जतन करून ठेवलेलं अन्न खाल्यामुळे कॅन्सर होत असल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. अनेक जण ही पोस्ट खरी आहे का? हे जाणून घेण्यासाठी एकमेकांना आणि विविध ग्रुपमध्ये फॉरवर्ड करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या माहितीखाली डॉ. मकरंद करमरकर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल असं माहिती देणाऱ्यांचं नाव नमूद करण्यात आलं होतं. फ्रिजमध्ये अन्न जपून ठेवणं, फळभाज्या आणून ठेवणं, चिकन, मटण आणि अंडी ठेवणं हा सर्रास प्रकार बहुतांश व्यक्तींच्या घरी होत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोस्ट बद्दल चर्चा होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे एबीपी माझा डिजिटलनं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. त्यामध्ये जी माहिती समोर आली आहे, त्यातून फ्रिजमधील अन्न खाऊन कॅन्सर होत नाही हे स्पष्ट झालं आहे.


विशेष म्हणजे टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे राज्यातच नव्हे संपूर्ण भारतात कॅन्सर विषयांवर उपचार करणारं मुख्य हॉस्पिटल म्हणून त्याची ख्याती आहे. या अशा प्रख्यात रुग्णालयाचे नाव वापरून ही माहिती फिरत असल्यानं या पोस्टला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. त्यामुळे एबीपी माझा डिजिटलनं थेट टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी संपर्क साधून या माहितीबाबत सत्यता पडताळून घेण्याचा प्रयत्न केला.



व्हायरल झालेला मेसेज...

याप्रकरणी, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी एस. एच. जाफरी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "आमच्याकडे डॉ. मकरंद करमरकर नावाचं कुणीही डॉक्टर आमच्याशी हॉस्पिटलशी संबंधित नाही. या अशा पद्धतीनं रुग्णालयाचं नाव वापरून चुकीची माहित पसरवल्यानं लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. तरी नागरिकांनी या माहितीवर जराही विश्वास ठेऊ नये."


जी चुकीची पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी राहिलेले मसाला वाटप, शिजवलेली भाजी, सर्व प्रकारची कडधान्यं, अंडी, वेगवेगळी मसाला पाकीटं, शिल्लक राहिलेली डाळ आणि अर्धवट खाल्लेली फळं असं जे काही कोंबून ठेवण्यात येतं. येथे कॅन्सरचे विषाणू तयार होतात, असा दावा करण्यात आला आहे. तसेच 1000 व्यक्तीचा अभ्यास केल्यानंतर हे दिसून आलं आहे की, यातील 538 जणांना कॅन्सरची लागण झाली असून यात स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे आणि आश्चर्य म्हणजे या 538 व्यक्तींनी फ्रिजमध्ये अन्न साठवून ठेवलेलं होतं, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.


माहीम येथील हिंदुजा रुग्णालयातील कॅन्सर विषयातील तज्ञ डॉ. सचिन आलमेल यांना याबाबत विचारले असता, "हे साफ खोटं वृत्त आहे. या माहितीला कुठलाही आधार नाही. माझी इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये कधी अशा पद्धतीची माहिती मला मिळालेली नाही. लोकांमध्ये अशी चुकीची माहिती पसरवू नये. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. या विषयांवरील कुठलाही शास्त्रीय पेपर माझ्या अजून बघण्यात आलेला नाही. "


केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, "सोशल मीडियाचा आधार घेऊन अशा चुकीची माहिती पसरविणे चुकीचं आहे. कुठलाही शास्त्रीय आधार नसलेली माहिती लोकांमध्ये पसरविणं हा अत्यंत वाईट प्रकार आहे. लोकांनी माहितीची खातरजमा केल्याशिवाय अशा पद्धतीच्या पोस्ट पुढे पाठविणे थांबिविले पाहिजे."


महत्त्वाच्या इतर बातम्या :