मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या वाढत्या समस्यांसोबतच अनेकांना वाढणाऱ्या वजनाचाही सामना करावा लागतोय. अशातच लॉकडाऊन अन् वर्क फ्रॉम होम यांमुळे बिघडलेलं रुटीन हेदेखील वजन वाढण्यासाठी कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतंय. वाढलेल्या वजनामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढंच नाहीतर वजन वाढल्यामुळे अनेक आजारही बळावण्याचा धोका वाढतो.


अशातच आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. कधी उपाशी राहणं, तर कधी जेवण कमी करणं. काही लोक तर कसलाही विचार न करता ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात, आणि कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय वजन कमी करण्यासाठी कोणतेही उपाय करण्यास तयार होतात. पण अस करणं शरीरासाठी अत्यंत घातक ठरु शकतं. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय बाजारात सर्रास उपलब्ध होणाऱ्या वजन कमी करण्याच्या औषधांचा वापर करणं किंवा कोणताही उपया करणं घातक ठरु शकतं. यामुळे इतरही अनेक समस्या किंवा आजार उद्भवण्याचा धोका असतो. पण त्याऐवजी तुम्ही व्यायामाचा मार्ग अवलंबवू शकता. दररोज केवळ 10 हजार पावलं चालूनही वजन कमी करणं सहज शक्य आहे.


10 हजार पावलं चालल्यानं होईल वजन कमी


जेव्हा आपण कोणतीही क्रिया करतो, त्यावेळी ऊर्जेच्या रुपात आपण आपल्या शरीरातील कॅलरी बर्न करत असतो. अशा व्यक्ती ज्यांना आपल्या बीझी शेड्यूलमुळे जिममध्ये जाता येत नाही, पण वाढलेलं वजन मात्र कमी करायचं आहे. त्या व्यक्ती हा उपाय करुन पाहू शकतात. असं केल्यानं उपाशी न राहता आणि कोणतीही औषधं न खाता तुम्ही तुमच्या वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.


10 हजार पावलं चालल्यानं बर्न होतात 400 कॅलरी


दरम्यान, अनेक लोक एक हजार पावलं चालल्यामुळे जवळपास 30 ते 40 कॅलरी बर्न करतात. ज्याचा अर्थ असा आहे की, ते जर 10 हजार पावलं चालल्यामुळे जवळपास 300 ते 400 कॅलरी बर्न करु शकतील. सध्या हा केवळ अंदाज आहे. तुम्ही चाललेल्या प्रत्येक पावलामुळे किती कॅलरी बर्न होतात, याचा अंदाज तुमचं वजन, उंची, फिटनेस, तुमचा वेह आणि तुम्ही कुठे चालताय त्यावर अवलंबून असतं.


सहज शक्य आहे चालणं


जर तुमचं वजन खरंच खूप वाढलं असेल आणि त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्हीदेखील हा उपाय करु शकता. रस्त्यावर किंवा ट्रेडमीलवर 10 हजार पावलं चालून तुम्हीही वजन कमी करु शकता. याव्यतिरिक्त तुमचं वजन वाढलं असेल, पण तुम्हाला लवकरचा लवकर फिट व्हायचं असेल, तर तुम्ही पायऱ्यांवर किंवा चढण असलेल्या रस्त्यावर 10 हजार पावलं चालून वजन कमी करु शकता.


(टिप : सदर गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :