मुंबई : 2017च्या आकडेवारीनुसार, 50 टक्के भारतीय महिला अ‍ॅनिमिया सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. शरीरातील आयर्नच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवते. आपल्या आहारात आयर्नचा योग्य समावेश तसेच आयर्न सप्लिमेंट्सचा वापर करून अ‍ॅनिमियासारखी समस्या दूर करणं सहज शक्य होतं. परंतु, आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी सर्वात उत्तम पद्धत म्हणजे, व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचं सेवन करणं. जाणून घेऊया आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.


अ‍ॅनिमिया म्हणजे काय?

रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाली, की त्या अवस्थेला अ‍ॅनिमिया असं म्हणतात. या आजाराला पंडुरोग असंही म्हटलं जातं. अ‍ॅनिमियाचेही बरेच प्रकार आहेत; परंतु रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया आपल्याकडे जास्त लोकांमध्ये आढळतो. अ‍ॅनिमियाची लक्षणं प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळून येतात. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, खाण्यापिण्याची हेळसांड ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत. अ‍ॅनिमिया एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या रक्त पेशींची संख्या कमी होते.

दररोज किती आयर्न शरीरासाठी आवश्यक?

एनएचएस (राष्ट्रीय स्वास्थ्य सेवा)नुसार, प्रोढ पुरूषांना दररोज जवळपास 8.7 मिलीग्राम आयर्नची आवश्यकता असते. तर प्रोढ महिलांना 14.8 मिलीग्राम आयर्नची गरज असते. परंतु, 50 पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये किंवा रजोनिवृत्तीनंतर महिलांना दररोज 8.7 मिलीग्राम आयर्नची गरज असते.

आयर्नच्या कमतरतेची लक्षणं :

  • थकवा जाणवणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • त्वचा पिवळी पडणं

  • दम लागणं

  • चिडचिडेपणा

  • एकाग्रता कमी होणं

  • रोगप्रतिकार शक्ती कमी होणं


आयर्नचा उत्तम स्त्रोत असणारे पदार्थ :

काही पदार्थांच्या मदतीने शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, मांस-मासे, अंडी, डाळी यांसारखे पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न असतं.

अ‍ॅनिमिया दूर करण्यासाठी कोणता आहार घ्यावा?

शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ नये, तसेच ते नियंत्रणात ठेवता यावे यासाठी लोह तसेच प्रथिनेयुक्त आहाराची गरज असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य, डाळी, सुकामेवा, गूळ, फळे, टरबूज यांचा प्रामुख्याने समावेश असावा. शाकाहरी व्यक्तीला अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी दूध आणि लोहयुक्त पदार्थांशिवाय दुसरा पर्याय नाही. मांसाहारी व्यक्तीने मासे, मटन, चिकन, अंडी यांचा वापर नियमित करावा.

टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

संबंधित बातम्या : 

हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे

खोबऱ्याचे तेल फक्त केस आणि त्वचेसाठी नाहीतर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर; जाणून घ्या कसं?

ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार