मुंबई : जास्तीत जास्त प्रायवेट कंपन्यांमध्ये 24x7 तासांची शिफ्ट म्हणजेच, दिवसाचे चोवीस तास काम करण्याची पद्धत रूढ होत आहे. अनेक लोकांना नाइट शिफ्टमध्ये काम करावं लागतं किंवा प्रत्येक आठवड्याला त्यांच्या काम करण्याची वेळ बदलत असते. म्हणजेच, कधी मॉर्निंग तर कधी इव्हिनिंग अन्यथा नाईट, अशा सर्व शिफ्ट मध्ये कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं. अशातच जर तुम्ही अशाच शिफ्टमध्ये काम करत असाल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण कामची वेळ सतत बदलत राहिल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या आजारांचा धोका अधिक वाढतो. एवढच नाहीतर अनेक मानसिक आजारांनाही निमंत्रण मिळतं.

डिप्रेशन किंवा नैराश्य
ब्रिटनमधील एका यूनिवर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून असं सिद्ध होत आहे की, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये डिप्रेशन किंवा नैराश्याची शक्यता 33 टक्यांनी अधिक असते. विशेषतः त्या लोकांच्या तुलनेत ज्या लोकांची शिफ्ट 9 ते 5 असते किंवा ज्या व्यक्ती नाइट शिफ्टमध्ये काम करत नाहीत.

मानसिक आजारांचा धोका
वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्येही मानसिक आरोग्याच्या समस्यांनी पीडित असण्याची शक्यता 28 टक्क्यांनी अधिक असते. ही आकडेवारी मागील 7 संशोधनांमध्ये सहभागी करण्यात आलेल्या व्यक्तींवर केलेल्या निरिक्षणांवरून सादर करण्यात आली आहे.

चिडचिड आणि मूड स्विंग्स
संशोधकांच्या मते, सतत शिफ्टमध्ये बदल होत असल्याने आपली झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीवर परिणाम होतो. आपलं शरीराला झोपण्याच्या किंवा उठण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल सहन होत नाहीत. त्यामुळे अनेकांना चिडचिड आणि मूड स्विंग्स यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच यामुळे व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर आणि नातेसंबंधांवरही परिणाम होतो, परिणामी मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो.

डायबिटीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोम
जपानमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करतात. त्यांना दिवसा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत डायबिटीस होण्याचा धोका 50 टक्के अधिक असतो. तसेच अशा व्यक्तींमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम ज्यामध्ये अनेक प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स जसं, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि अनहेल्दी कोलेस्ट्रॉल लेव्हल यांसारख्या समस्यांचा समावेश होतो.

व्यायाम करा, कुटुंबीयांसाठी वेळ द्या
संशोधकांनी असं सांगितलं आहे की, डिप्रेशन किंवा इतर मानसिक आजारांपासून बचाव करण्यासाठी व्यायाम हा उत्तम उपाय ठरतो. त्यामुळे तुमच्या बीझी शेड्यूलमधून व्यायामासाठी वेळ काढा. तसेच कुटुंबीयांनाही काही वेळ द्या. या गोष्टींमुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत होते.

टिप : सदर गोष्टी संशोधनांमधून सिद्ध झाल्या आहेत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.