मुंबई : खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपल्या सर्वांना माहितच आहेत. आयुर्वेदातही खोबऱ्याच्या तेलाचे आरोग्यवर्धक गुणधर्म सांगण्यात आले आहे. हे तेल त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतंच, पण तुम्हाला माहित आहे का? या तेलाचा वापर तुम्ही जेवणातही करू शकता. एवढंच नाहीतर खोबऱ्याचे तेल अनेक आजारांमध्येही फायदेशीर ठरते. सध्या वातावरण बदलत असून बदलणाऱ्या वातावरणामुळे ताप, सर्दी-खोकला आणि घशाच्या विकारांचा सामना करावा लागतो. यांपैकी काही समस्या तुम्ही घरगुती उपायानेही दूर करू शकता. जाणून घेऊया अशा समस्यांवर खोबऱ्याच्या तेलाचा वापर कसा करावा याबाबत काही टिप्स...
घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याचे तेल -
- घशात होणारी खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याचे तेल हा उत्तम उपाय आहे. खोबऱ्यामध्ये असणारे अॅन्टीइंफ्लेमेट्री गुणधर्म घशातील खवखवीमुळे उद्भवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच खोबऱ्याच्या तेलामध्ये जे अॅन्टीसेप्टिक गुणधर्म असतात. ते बॅक्टेरिया, फंगस आणि इतर व्हायरसशी लढण्यासाठी मदत करतात.
घशातील खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा असा करा वापर :
घशातील खवखव दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता.
एका वाटीत थोडेसे खोबऱ्याचे तेल घेऊन ते गरम करा आणि त्याने गळ्याला मालिश करा. त्यानंतर एखाद्या कॉटनच्या कापडाच्या मदतीने गळ्याभोवती अलगद गुंडाळून ठेवा. यामुळे गळ्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
याव्यतिरिक्त खोबऱ्याचं तेल, मध आणि लिंबाचा उपयोग करून घरातच एक सिरप तयार करू शकता. हे सिरप आणखी गुणकारी करण्यासाठी त्यामध्ये आल्याचा रस आणि काही तुळशीच्या पानांचाही वापर करू शकता.
कफ सिरप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
4 चमचे ताज्या लिंबाचा रस
एक कप मध
3 चमचे खोबऱ्याचं तेल
असं तयार करा घरच्या घरी कफ सिरप :
गॅसवर मध्यम आचेवर एक पॅन ठेवा, सर्व साहित्य एका भांड्यात व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर मिश्रण गॅसवरील पॅनमध्ये ठेवून गरम करा. काही वेळाने गॅस बंद करा आणि सिरप एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा.
तयार सिरप तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात किंवा ग्रीन टीसोबत एकत्र करू शकता. घशात होणारी खवखव दूर करण्यासोबतच सर्दी-खोकल्यावरही हे सिरप गुणकारी ठरतं. एवढंच नाहीतर हे सिरप इन्फेक्शन होण्यास कारण ठरणारे बॅक्टेरिया दूर करण्यासाठीही मदत करतात.
टिप : सदर उपाय घरगुती असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याचा वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
खोबऱ्याचे तेल फक्त केस आणि त्वचेसाठी नाहीतर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर; जाणून घ्या कसं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2019 11:18 AM (IST)
खोबऱ्याच्या तेलाचे फायदे आपल्या सर्वांना माहितच आहेत. आयुर्वेदातही खोबऱ्याच्या तेलाचे आरोग्यवर्धक गुणधर्म सांगण्यात आले आहे. हे तेल त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतंच, पण तुम्हाला माहित आहे का? या तेलाचा वापर तुम्ही जेवणातही करु शकता. एवढंच नाहीतर खोबऱ्याचे तेल अनेक आजारांमध्येही फायदेशीर ठरते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -