6th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 6 मे चे दिनविशेष.


1856 : आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म.


सिग्मंड फ्रॉइड हे प्रख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, वैद्य आणि मनोविश्लेषणाचे प्रणेते होते. सिग्मुंड फ्रॉइड हे ऑस्ट्रियन मज्जाशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले. विसाव्या शतकातील एक थोर विचारवंत म्हणून फ्रॉइड यांचे स्थान आहे. त्यांनी मानवी मनाबाबत मांडलेल्या संकल्पनांमुळे मानवी स्वभावा बाबतच्या पारंपारिक कल्पनांमध्ये फार मोठी उलथापालथ झाली. 


1857 : ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीची 34 वी रेजिमेंट बरखास्त केली. रेजिमेंटचे शिपाई मंगल पांडे यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला.


1861 : भारतीय स्वातंत्र्यसेनानी मोतीलाल गंगाधर नेहरु यांचा जन्म. 


मोतीलाल गंगाधर नेहरू हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित होते. पंडित मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते. ते अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकिली सोडून दिली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. 1923 साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास आणि लाला लजपत राय ह्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1928 साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच 1928 मध्ये काँग्रेस पक्षाने भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. 


1889 : पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.


आयफेल टॉवर ही 1889 साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. फ्रान्सची ओळख आयफेल टॉवरनेच केली जाते. आयफेल टॉवर 324 मीटर उंच आहे आणि त्याला तीन मजले आहेत. गुस्ताव्ह आयफेल ह्या फ्रेंच वास्तूशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सुमारे 300 कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला. 31 मार्च 1889 रोजी त्याचे उद्घाटन झाले. 6 मे 1889 रोजी आयफेल टॉवर लोकांसाठी खुला करण्यात आला.


1922 : थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांचे निधन. 


छत्रपती राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक होते. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते होते. शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना  1919 साली ‘राजर्षी’ पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली.


2010 : मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.


26 नोव्हेंबर 2008 रोजी समुद्रमार्गे आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले होते. त्यात 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 


महत्वाच्या बातम्या :