Maharashtra Police : पोलीस भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरु होणार, महाराष्ट्र पोलीस दलाकडून विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना
Maharashtra Police Recruitment : महाराष्ट्र पोलीस दलातील विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरु होणार आहे. या बाबत पोलिसानी विद्यार्थ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलीस भरती प्रक्रियबाबत त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 17 हजार पदे रिक्त होती. राज्यातून या पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आलेले आहेत, अशी माहिती राजकुमार व्हटकर यांनी दिली. कारागृह भरतीही आम्ही करत असतो 1हजार 800 पदासाठी 3 लाख 72 हजारहून अधिक अर्ज आलेले आहेत, अशी माहिती व्हटकर यांनी दिली.
अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी लोकसभा निवडणुकीमुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण करण शक्य नव्हतं मात्र 19 जून पासून भरती प्रक्रिया होणार आहे, असं म्हटलं. पोलीस भरतीची लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. जाहिरातीत आम्ही एक गोष्ट स्पष्ट दिली होती. दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही. मात्र, दोन वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो.विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाही त्यांना त्यात सूट देण्यात आलेली नाही. भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होत आहे, असं राजकुमार व्हटकर यांनी म्हटलं.
ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या दिवशी मैदानी परीक्षा ही पुढे ठेवली जाईल तर उमेदवारांना कळवलं जाईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या उमेदवारांची व्यवस्थाही आमच्या वेल्फर हाॅल येथे केली जाईल. सर्व उमेदवारांना हजर केले जाईल. महाराष्ट्र पोलीस दलाची भरती ही मेरिटनं आणि पारदर्शकपणे होते. दरवर्षी आमच्या ज्या गोपनीय यंत्रणा आहेत त्यांना आम्ही सक्रीय करत असतो.
कुठलाही एजंट आपल्याला आश्वासन देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन राजकुमार व्हटकर यांनी केलं आहे. एखादा एजंट आश्वासन देत असल्याचं निदर्शनास आले तर आमच्याशी संपर्क करा. मागच्या वर्षी असे प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे, असंही राजकुमार व्हटकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पावसाळ्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था सरकार तर्फे करण्यात यावी, अशी मागणी केली होती. यावर देखील अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी वेलफअर हॉलमध्ये व्यवस्था केल्याची माहिती दिली आहे.
संंबंधित बातम्या :