फॅन्ससाठी खुशखबर! हृतिक-फरहान-अभय देओल पुन्हा एकत्र, 14 वर्षांनंतर ZNMD चा सीक्वल येतोय
आजही या चित्रपटाचे संवाद, कविता आणि गाणी सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशातच आता या कल्ट क्लासिकच्या सीक्वलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Zindagi na Milegi dobara: 2011 साली प्रदर्शित झालेला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट केवळ सिनेमा नव्हता, तर तो तरुणाईच्या भावना, मैत्री, आत्मशोध आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मांडणारा अनुभव ठरला होता. आजही या चित्रपटाचे संवाद, कविता आणि गाणी सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशातच आता या कल्ट क्लासिकच्या सीक्वलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
चित्रपट दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा 2’ च्या कथेचा पहिला ड्राफ्ट पूर्ण केला असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, झोया या कथानकावर समाधानी असून, बराच काळ रखडलेल्या या फ्रँचायझीला पुढे नेण्यासाठी त्या मानसिकदृष्ट्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे ZNMD चा सीक्वल प्रत्यक्षात येण्याच्या आशा पुन्हा एकदा बळावल्या आहेत.
कबीर- अर्जुन-इमरान पुन्हा एकत्र दिसणार
मिड-डेच्या रिपोर्टनुसार, सीक्वलमध्ये पुन्हा एकदा ऋतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल ही ओरिजिनल तिकडी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. कबीर, इमरान आणि अर्जुन या पात्रांनी पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला होता. यावेळी मात्र कथा एका नव्या टप्प्यावर पोहोचलेली दिसणार आहे. या चित्रपटात तिन्ही मित्र त्यांच्या 40 च्या दशकात दाखवले जाणार आहेत. जिथे आयुष्य केवळ साहस आणि स्वप्नांपुरतं मर्यादित न राहता, जबाबदाऱ्या, पश्चात्ताप, अपूर्ण इच्छा आणि नात्यांच्या गुंतागुंतींनी भरलेलं असतं. झोयाला केवळ नॉस्टॅल्जियावर आधारित सीक्वल नको असून, बदललेल्या काळाचं वास्तव मांडण्यावर तिचा भर असल्याचं सांगितलं जात आहे.
बहुप्रतिक्षित सीक्वल प्रत्यक्षात कधी येणार?
सध्या या चित्रपटासाठी कलाकारांशी चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय त्यांच्या डेट्स आणि कमिटमेंट्सवर अवलंबून असणार आहे. सर्व काही अनुकूल ठरल्यास या वर्षाअखेरीस किंवा 2026 पूर्वी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, फरहान अख्तर सध्या ‘जी ले जरा’ या चित्रपटावर काम करत आहेत, तर झोया अख्तर ‘दहाड 2’ च्या निर्मितीत व्यस्त आहेत. मात्र, ZNMD 2 संदर्भातील या घडामोडींमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता हा बहुप्रतिक्षित सीक्वल प्रत्यक्षात कधी येणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
























