Year Ender 2024 : साबरमती ते महाराज, या वर्षात 'हे' सिनेमे अडकले वादाच्या भोवऱ्यात!
Year Ender 2024: बॉलिवूडचे अनेक सिनेमे 2024 या वर्षात वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Year Ender 2024: अवघ्या काही दिवसांतच सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे. यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले. त्याचवेळी अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. काही चित्रपटांना नोटीस पाठवण्यात आली होती तर काही चित्रपटांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होता. वादांनी घेरलेल्या चित्रपटांच्या यादीत गुजरातमधील गोध्रा घटनेवर बनवलेला विक्रांत मॅसी स्टारर 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) सह अनेक सिनेमांचा समावेश आहे.
द साबरमती रिपोर्ट
निर्माती एकता कपूर आणि दिग्दर्शक धीरज सरना यांचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट 15 नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. गुजरातच्या गोध्रा घटनेवर बनवलेल्या चित्रपटाबाबत बराच गाजावाजा झाला आणि हा चित्रपट वादात सापडला. 2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या एस-6 कोचला आग लागली होती. अयोध्येहून येणाऱ्या या डब्यात कारसेवक प्रवास करत होते. यामध्ये 59 जणांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. विक्रांत मॅसी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा अभिनीत हा चित्रपट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला.
महाराज
या वर्षी प्रदर्शित झालेल्या वादग्रस्त चित्रपटांच्या यादीत आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा पहिला चित्रपट 'महाराज' याचं नावही सामील आहे. या चित्रपटावर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. सौरभ शाह यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती YRF एंटरटेनमेंटने केली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने एका हिंदू गटाच्या याचिकेवर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती दिली होती. चित्रपटात जुनैद खानसोबत जयदीप अहलावत, शालिनी पांडे आणि शर्वरी वाघ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'महाराज' नेटफ्लिक्सवर 21 जून रोजी प्रदर्शित झाला.
'हम दो हमारे बारह'
कमल चंद्रा दिग्दर्शित 'हम दो हमारे बारह' या चित्रपटाचे निर्माते रवी एस गुप्ता, बिरेंद्र भगत, संजय नागपाल आणि शेओ बालक सिंग आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते त्रिलोकी प्रसाद आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या समस्येवर आधारित या चित्रपटात अन्नू कपूरसोबत अश्विनी काळसेकर, राहुल बग्गा, परितोष तिवारी, पार्थ समथान, मनोज जोशी, नवोदित अदिती भटपहारी यांच्यासह इतर स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 13 जून रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी दिल्यानंतर 21 जून 2024 रोजी तो प्रदर्शित झाला. या चित्रपटावर मुस्लिम समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.
कल्कि 2898 ए.डी
अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर 'कल्की 2898 एडी' देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी या चित्रपटाबाबत चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना नोटीस पाठवली होती, ज्यामध्ये त्यांनी धार्मिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता.