Vijay Kadam : किमोसाठीचे पैसे इन्शुरन्स कंपनीने नाकारले ते शिंदे-फडणवीसांची मदत, विजय कदम यांच्या पत्नीने सांगितला कर्करोगाशी झुंजतानाचा खडतर प्रवास
Vijay Kadam : विजय कदम यांच्या पत्नीने कर्करोगामधील त्यांचा खडतर प्रवास सांगितला आहे.
Vijay Kadam : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी शनिवार 10 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. 'विच्छा माझी पुरी करा', 'टुरटुर' अशा अनेक अविरत नाटकांचा प्रवास करत त्यांनी रंगभूमीवर विनोदांची खळखळणारी सफर प्रेक्षकांना घडवली. पण गंभीर आजाराशी लढता लढता या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली.
विजय कदम यांनी कर्करोगाशी झुंज देताना केलेल्या खडतर प्रवासाविषयी त्यांच्या पत्नीने इट्स मज्जा या युट्युब चॅनलाल दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे या काळात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत कशी झाली याविषयी देखील भाष्य केलं आहे.
'चार किमोनंतर फक्त दोनच मित्रांना सांगितलं'
विजय कदम यांच्या आजारातील काळाविषयी बोलताना त्यांच्या पत्नीने म्हटलं की, त्याच्या आजाराविषयी मी इंडस्ट्रीमध्ये फार कुणाला काही कळू दिलं नव्हतं. कारण हा म्हणजे जगतमित्र आहे. ह्याच्याविषयी लोकांना कळालं असतं तर मी फक्त फोनवरच बोलत राहिले असते. त्यामुळे कुणालाही सांगितलं नाही. त्याच्या चार केमो झाल्या, दोन सर्जरी झाल्या, त्यानंतर मी त्याच्या दोन मित्रांना सांगितलं. ते मित्र म्हणजे विजय पाटकर आणि जयवंत वाडकर कारण हे त्रिकुट आहे. इतकी महत्त्वाची गोष्ट त्यांना माहिती असायलाच हवी होती.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मदत
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विजय कदम यांना मदत मिळाली. त्यावर त्यांच्या पत्नीने म्हटलं की, 'पण एका टप्प्यावर मला मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून थोडी मदतीची गरज होती. त्यावेळी सुशांत शेलार आणि मंगेश देसाई या दोघांनी मला ती मदत केली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवलं.'
'त्यानंतर असं झालं की, संकटं जेव्हा येतात तेव्हा ती सगळीकडून येतात. ज्यावेळी पहिलं किमो करायचं ठरलं, त्यावेळी मी माझ्या इन्शुरन्स कंपनीला कळवलं. नानावटीमध्ये आम्ही किमो करायचं ठरवलं आणि नानावटी त्यांच्या कॅशलेस पेमेंटच्या लिस्टमध्ये येतं. जी मुलगी एजंट होती, ती मला म्हणाली की, तुम्ही फॉर्म भरा सगळं व्यवस्थित होईल. सगळं झालं फॉर्म भरला आणि फेब्रुवारीमध्ये किमो सुरु होणार तेव्हाच मला त्या कंपनीकडून लेटर आलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, तुमचा इन्शुरन्स आम्ही नाकारत आहोत, कारण यांना डायबिटीज असल्याचं तुम्ही आम्हाला सांगितलं नाही'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'या सगळ्या प्रकारामध्ये मी त्यांना म्हटलं, हे कसं शक्य आहे? 14 वर्ष त्या माणासाला डायबिटीज आहे. तुमच्या फॉर्मच्या पहिल्या पानावर मी लिहिलं आहे की, त्याला डायबिटीज आहे. तरीही त्यांनी आमचा क्लेम नाकारला. त्यावेळी बिमा लोकपालमध्ये मी त्यांच्याविरुद्ध केस केली. त्या केसच्या तारखांना मी हजर राहत होते, ती एक लढाई लढत होते. ती केस आम्ही लढून माझ्या बाजूने निकाल लागला, तरीही ते मला पैसे द्यायला तयार नाहीत. शेवटी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेले, त्यांच्या प्रशासकीय कार्यालयाने आम्हाला मदत केली.'