मुलीचा जन्म आणि शिक्षणावर भर देणाऱ्या स्टार प्रवाहवरील दोन मालिका 2 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला
स्टार प्रवाहवर 2 सप्टेंबरपासून 'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'मुलगी झाली हो' असं या दोन मालिकांचं नाव असून या दोन्ही मालिकांद्वारे मुलीचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व यासारख्या सामाजिक विषयाला हात घालण्यात येणार आहे.
मुंबई : स्टार प्रवाह वाहिनी येत्या 2 सप्टेंबरपासून दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. 'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'मुलगी झाली हो' असं या दोन मालिकांचं नाव असून या दोन्ही मालिकांद्वारे मुलीचा जन्म आणि त्यांच्या शिक्षणाचं महत्त्व यासारख्या सामाजिक विषयाला हात घालण्यात येणार आहे. 'रंग माझा वेगळा'सारखी वर्णभेदावर भाष्य करणारी मालिका टेलिव्हिजन विश्वात आणत स्टार प्रवाह वाहिनीने नवं आव्हान पेललं. या मालिकेनंतरचं पुढचं पाऊल म्हणून 'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'मुलगी झाली हो' या दोन मालिकांचा उल्लेख करता येईल.
आजही कित्येक ठिकाणी वंशाला दिवा हवाच या हव्यासापोटी मुलीचा भृण गर्भातच संपवला जातो. तिच्या जगण्याचा मुलभूत हक्कच नाकारला जातो. 'मुलगी झाली हो' या मालिकेतून याच भावनिक विषयावर भाष्य करण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे साजिरीची. जिचा जन्मच तिच्या पित्याकडून नाकारण्यात आला. अश्या या साजिरीचं काय असेल भविष्य? याची भावनिक गोष्ट 'मुलगी झाली हो' या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
मुलीच्या जन्माप्रमाणेच तिचं शिक्षण हा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.
या दोन्ही मालिकांचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, "स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच कथेमध्ये वेगळेपणा जपत असते. ते करत असताना संपूर्ण कुटुंब ती मालिका एकत्र बघू शकेल याकडेही लक्ष असतं. मालिकेचा एखादा भाग पाहायचा राहून गेला तर काहीतरी मिस करु अशा धाटणीच्या या दोन्ही मालिकांच्या कथा आहेत. समोर येणाऱ्या परिस्थितीवर मात करुन कसं जगायचं आणि त्यासाठी योग्य साथ कशी असावी याचं उदाहरण म्हणजे या दोन मालिका असतील. मुलगी होण्याचा आणि असल्याचा अभिमान दर्शवणारी हृदयस्पर्शी मालिका 'मुलगी झाली हो' आणि जोडीदार योग्य असेल तर काहीच अशक्य नाही हे सिद्ध करणारी 'फुलाला सुगंध मातीचा' ही अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे."