Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ओंकार भोजनेची एक्झिट! कारण ऐकलंत का?
Onkar Bhojane : अभिनेता ओंकार भोजने आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून बाहेर पडणार असून, ‘फू बाई फू’च्या नव्या पर्वात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.
Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला सगळ्यांचा लाडका अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) आता या कार्यक्रमातून एक्झिट घेणार आहे. ओंकार या कार्यक्रमातून बाहेर पडतोय हे कळल्यानंतर आता त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र, तो एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज होणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्याने प्रेक्षकांना खळखळवून हसवले. आता तो पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
अभिनेता ओंकार भोजने आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून बाहेर पडणार असून, ‘फू बाई फू’च्या नव्या पर्वात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ओंकारचे चाहते देखील त्याला ‘फू बाई फू’च्या नव्या पर्वात पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. ओंकार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून बाहेर पडणार असल्याची माहिती एक सोशल मीडिया पेजवरून देण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप अभिनेता किंवा वाहिनीने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
पाहा पोस्ट :
चित्रपटातही झळकणार ओंकार!
छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या 'कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस', 'तुमच्यासाठी काही पण', ' एकदम कडक' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमधून ओंकार भोजने (Onkar Bhojane) महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि 'अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..' या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले. आता हाच कॉमेडी किंग लवकरच मोठ्या पडद्यावर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मिती असलेल्या एका बिग बजेट मराठी चित्रपटात अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) पहिल्यांदाच मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या निमित्ताने एका वेगळ्या अंदाजात तो आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे.
‘फू बाई फू’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला!
‘झी मराठी’ नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली आहे. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाचे अनेक सीझन प्रदर्शित झाले होते. आता 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ‘झी मराठी’ कॉमेडीचा एक नवीन तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘फू बाई फू’ हा गाजलेला कार्यक्रम पुनः एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत. तसेच, काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून, परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत.
हेही वाचा :