एक्स्प्लोर
म्हाळसा, शनाया, तांबडेबाबांचे भक्त... 'बिग बॉस मराठी'मध्ये यंदा कोण?
बिग बॉसच्या घरात नवे शिलेदार कोण असणार, कोणाचा होणार गृहप्रवेश, याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. म्हणूनच 'बिग बॉस'च्या संभाव्य स्पर्धकांची यादी आम्ही सांगणार आहोत.
मुंबई : स्पर्धकांमध्ये रंगणारे चुरशीचे गेम, तुफान राडा, स्पर्धकांमधली धुमसती ठसन... कोण कधी कोणाच्या बाजूने, तर कोण कधी कोणाच्या विरोधात. खास तिरकस शैलीत मिळणाऱ्या कानपिचक्या... या सगळ्या गोष्टींमुळे बिग बॉसचा पहिला सिजन चांगलाच गाजला. आता चर्चा आहे ती 'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या सिजनची. 'बिग बॉस मराठी'चा पुढचा सिझन अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. नवा सिजन म्हटला की नवे स्पर्धक आलेच. बिग बॉसच्या घरात नवे शिलेदार कोण असणार, कोणाचा होणार गृहप्रवेश, याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. म्हणूनच 'बिग बॉस'च्या संभाव्य स्पर्धकांची यादी आम्ही सांगणार आहोत.
'बिग बॉस'च्या पहिल्या प्रोमोमुळे चर्चा रंगली लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची. लावणीचे फड गाजवल्यानंतर ही लावण्यवती आता बिग बॉसचा फड गाजवायला सज्ज झाल्याचं म्हटलं जात आहे.
दुसरा स्पर्धक आहे हँडसम हंक भूषण प्रधान... अनेक मालिका आणि सिनेमांमधून घराघरात पोहचलेला भूषण 'बिग बॉस'च्या घरात गेला, तर काय कमाल करतो, याकडे साऱ्यांचंच लक्ष असेल.
'जय मल्हार' मालिकेतली 'म्हाळसा' म्हणजेच सुरभी हांडेसुद्धा बिग बॉसच्या शर्यतीत आहे म्हणे. सुरभी सध्या 'लक्ष्मी सदैव मंगलम' मालिकेत भूमिका करते. अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिकांमध्ये वावरणारी मनवा नाईक 'बिग बॉस'च्या घरात शिरण्याची शक्यता आहे.
अभिजीत बिचुकले, सुरेखा पुणेकर; 'मराठी बिग बॉस 2'चे संभाव्य स्पर्धक
या खेळात सहभागी होणारा आणखी एक तगडा स्पर्धक आहे अभिनेता मिलिंद शिंदे. तांबडेबाबांचा हा परम भक्त बिग बॉसच्या घरात गेला, तर कल्ला करणार यात शंका नाही.
'वस्त्रहरण' नाटकात तात्या सरपंच साकारणाऱ्या दिगंबर नाईकचंही नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे. त्याशिवाय विनोदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघरच्या नावाचीही चर्चा आहे. 'टिकटॉक'गर्ल म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री अमृता देशमुखही या घरात दिसेल. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतली एक्स शनाया म्हणजेच रसिका सुनीलही बिग बॉसच्या घरातली स्पर्धक असल्याची चर्चा आहे.
'बिग बॉस'चे जे प्रोमोज सध्या सुरु आहेत त्यात चर्चा आहे ती कवीमनाच्या राजकीय नेत्याची. कवीमनाचा राजकीय नेता म्हटलं की आपल्यासमोर येतात ते रामदास आठवले. पण या घरात जो नेता येणार आहे त्याचं नाव आहे अभिजीत बिचुकले. साताऱ्याच्या हा नेता विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. अगदी उदयनराजे भोसलेही बिचकुलेला बिचकून असतात.
नेहा नावाची एक अभिनेत्रीही या स्पर्धेत आपलं नशीब आजमवणार आहे, पण ती नेहा, नेहा गद्रे असेल की नेहा शितोळे याच्या उत्तरासाठी थोडं थांबावं लागेल. नेहा शितोळे म्हणजेच 'सेक्रेड गेम्स' मधली मिसेस काटेकर.
केतकी या नावाच्या बाबतीतही तसंच आहे. केतकी चितळे की केतकी माटेगावकर? एक अत्यंत लाघवी, गोड... दुसरी एपिलेप्सीची पेशंट असूनही चांगली वागणूक न दिल्याने निर्मात्यांना चांगलंच धारेवर धरणारी केतकी चितळे. कीर्तन करणाऱ्या पाटील आडनावाच्या एका महिलेचं नावही चर्चेत आहे.
यासोबतच अभिनेत्री शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्यांमध्ये अभिनेता चिन्मय उदगीरकर सुद्धा असल्याची चर्चा आहे. या दोघांच्या नावांसोबतच माधव देवचक्के आणि प्राची पिसाट यांचा देखील संभाव्य स्पर्धकांच्या यादीत समावेश आहे.
'बिग बॉस मराठी 2' चा पहिला एपिसोड रविवार 19 मे रोजी प्रक्षेपित होणार असल्याची माहिती आहे. या दिवशी पर्वातील सर्व स्पर्धकांची ओळख परेड होईल. या भागाच्या चित्रीकरणाला 17 मेपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये 'बिग बॉस मराठी'चा सेट उभारण्यात येत आहे
अर्थात ही आम्हाला कळलेली संभाव्य स्पर्धकांची यादी आहे. खरा धमाका होण्यासाठी थोडी वाट पाहावीच लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement