मुंबई : सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील बच्चे कंपनीचा आवडता असणारा टप्पू. टप्पूची भूमिका साकरणाऱ्या भव्य गांधीने आपल्या अभिनयानं आपली वेगळी ओळख निर्माण केली. टप्पूची भूमिका साकरणाऱ्या भव्य गांधीवर आभाळ कोसळलं आहे. भव्यचे वडिल विनोद गांधी यांचं कोरोनामुळे निधन झालं. मंगळवारी रात्री मुंबईतील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 51 वर्षांचे होते. 


भव्य गांधी याच्या कुटुंबियांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "कोरोनाची लागण झाल्यानंतर विनोद गांधी दोन दिवस होम क्वॉरंटाईन होते. पण अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे त्यांच्या मुलांनी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते." 


अचानक ऑक्सिजन लेव्हल झाली होती कमी 


नातेवाईकांनी पुढे बोलताना सांगितलं की, "विनोद गांधी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत होती. परंतु, मंगळवारी रात्री अचानक त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झुंज दिली, परंतु, ते या लढाई पराभूत झाले. त्यांना यापूर्वी कोणताही इतर आजार नव्हता."


भव्य गांधीचं गुजराती चित्रपटात पदार्पण 


महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भव्य गांधीनं 2008 पासून 2017 पर्यंत म्हणजेच, 9 वर्ष 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम केलं. या मालिकेत त्यांनी दिलीप जोशी (जेठालाल गडा) आणि दिशा वाकाणी (दया जेठालाल गडा) या दाम्पत्याच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यानंतर चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी भव्य गांधीने मालिकेला गुड बाय म्हणत चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. काही गुजराती चित्रपटांमधून भव्य गांधीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :