मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे झाल्यापासून या दोन शहरांत ये-जा करणाऱ्यांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. अवघ्या काही तासांत शहरात येता येत असल्यामुळे अनेक कलाकार-उद्योगपती-व्यापारी आदी मंडळी या रस्त्यावरून सतत ये जा करत असतात. पण रविवारी अभिनेता योगेश सोहोनीला आलेल्या अनुभवानंतर मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या सर्वच मंडळींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तर हा सगळा प्रकार आपल्याला संमोहित करून घडवला गेला असल्याचा अनुभव अभिनेता योगेशने एबीपी माझासोबत शेअर केला आहे.  


अभिनेता योगेशला आपण यापूर्वी अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे. यापूर्वी झी मराठीच्या अस्मिता मालिकेमध्ये तो काम करत होता. शिवाय सध्या स्टार प्रवाहवर चालू असलेल्या मुलगी झाली हो या मालिकेत तो शौनक जहांगीरदार ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. एक्स्प्रेस वेवर आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना योगेश म्हणाला, सध्या मालिका लोकप्रिय असल्यामुळे मी गाडीतून प्रवासाला बाहेर पडलो की अनेक लोक हात दाखवून जातात. काही लोक आवर्जून आम्ही मालिका बघतो असंही सांगतात. काहींना फोटो हवा असतो. मग मी फोटोही देतो. खूपच चांगली मंडळी आजवर मला भेटली. शनिवारी माझ्या पुण्याच्या नातलगांकडे मी चाललो होतो. तिथे सोमाटणे फाट्याजवळ मागून एक स्कॉर्पिओ आली. त्याने मला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. मी गाडी बाजूला घेऊन थांबलो. त्यानेही त्याची गाडी बाजूला घेतली. त्यातून एक जाड, गळ्यात सोन्याच्या चेन असलेला इसम उतरला. मी गाडी हाय वे वर उजव्या बाजूला घेतल्याने मागून येणाऱ्या त्याची गाडी त्याला कंट्रोल झाली नाही. त्यामुळे त्याच्या गाडीने एका मुलाला धडक बसल्याचं तो सांगू लागला. मी त्याला तिथेच असं काही झालं नसल्याचं सांगू लागलो. मी वाद घालू लागल्यावर मी काय भिकारी वाटलो काय, असं सांगत खिशातून पाचशेच्या नोटांचं एक लाखाचं बंडल काढून दाखवलं. तो माझ्याकडून सव्वा लाख रूपये मागू लागला. हा इसम धादांत खोटं बोलतोय असं मी त्याला सांगत असतानाच त्यानं मला संमोहित केलं. मी त्याच्याशी बोलू लागलो. या काळात मी यंत्रवत वागू लागलो. शेवटी 50 हजारावर प्रकरण आलं. तो माझ्या गाडीत बसला त्याने मला सोमाटणे फाट्यावर पुढे एका बँकेचं एटीएम असल्याचं सांगितलं. मी तिथे जाऊन त्याला पन्नास हजार काढून दिले. त्याला खरंतर आणखी दहा हजार हवे होते. पण माझं एटीएमचं लिमिट संपलं होतं. मग आम्ही परत त्या स्पॉटवर आलो. त्यानंतर तो गाडीत बसून थेट निघूनही गेला. त्यानंतर मी गाडीत बसून पुण्यात आलो. तरीही माझ्यासोबत नक्की काय प्रकार घडलाय तो खरंच घडलाय की नाही हेच मला कळेना. एकिकडे बँकेचा पैसे काढल्याचा मेसेज तर फोनमध्ये होता. मी तसाच रविवारी पुन्हा मुंबईला यायला निघालो. पुन्हा तळेगावच्या फाट्यावर आल्यावर नक्की काय झालंय हे चेक करावं म्हणून गाडी मुंबईच्या दिशेला लावून मी तळेगाव टोल नाक्यावर काल इथे काही अपघात झालाय का याची चौकशी केली. तसं काहीच झालं नव्हतं. मग घडला प्रकार तिथल्या इन्चार्जना सांगितल्यावर असे प्रकार या रस्त्यावर वारंवार होतायत असं कळलं. त्यानंतर मी तडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची ठरवली. 


पोलीसांत तक्रार देण्यासाठी जाताना आणि नतर पोलिसांनी केलेल्या सहकर्याचाही उल्लेख योगेशने आवर्जून केला. तो म्हणाला, सोमाटणे फाटा शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. मी तिथे जाऊन घडला प्रकार सांगितला. पोलीस ठाण्याचे सिनिअर पीआय सुनील पिंजळ यांनी तातडीने त्याची दखल घेतली. माझ्यासोबत पोलीस पाठवून पाहणी केली. हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी लगेच हा कोण इसम असू शकेल ते ताडलं. त्यांनी मला फोटो दाखवले. त्यातून एका इसमाला मी ओळखलं. गाडी नंबर सांगितला. रविवारी बँक बंद असल्यामुळे सोमवारी बँकेच्या एटीएमचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. यावरून संबंधित इसमाची ओळख पोलिसांना पटली आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. ती गाडीही पोलिसांनी आधी जप्त केली होती. पोलिसांनी तातडीने पावलं उचलली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण संमोहित करून असं लुटण्याचा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. मी पोलिसांत एफआयआरही दाखल केली आहे. तीन दिवस उलटूनही तो इसम अजून हाती लागलेला नाही. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणी लक्ष घालावं असं मला वाटतं, असंही योगेश म्हणाला. 


ही घटना शनिवारी घडली. रविवारी योगेशने पोलीसांत एफआयआर दाखल केली. पोलीस तपास करत आहेतच. पण तीन दिवस झाल्यानंतरही अद्याप ओळख पटलेला इसम पोलिसांना सापडलेला नाहीय. या इसमाला संमोहन करता येत असल्यामुळे न जाणो दुसऱ्या कुठल्या महामार्गावर त्याने असा सापळा लावला असेल, अशावेळी तातडीने याला जेरबंद करणं गरजेचं आहे, असंही योगेशने सांगितलं.