Superstar Singer : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपरस्टार सिंगर 2’मध्ये या आठवड्यात धमाल मस्ती असणार आहे. कारण, हा ‘गोविंदा आणि चंकी’ विशेष भाग असणार आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आलेख गगनाला भिडेल यात काही शंकाच नाही. या भागात बॉलिवूडचे दोन 'कॉमेडी किंग' गोविंदा (Govinda) आणि चंकी पांडे या मंचाची शोभा वाढवणार आहेत. हे दोघे या भागात ‘राजा बाबू’ आणि ‘आखरी पास्ता’ या आपल्या गाजलेल्या भूमिकांच्या वेशभूषेत दिसणार आहेत.


या भागात स्पर्धकांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्सेस बरोबरच मस्ती, विनोद, डान्स, रंजक किस्से कहाण्यांची बहार असणार आहे, ज्यामुळे हा वीकेंड नक्कीच संस्मरणीय होईल.


ऋतुराज आणि हर्षिताचे गाणे ऐकून झाले थक्क


यावेळी गोविंदा आणि चंकी पांडे स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसतील. असाच एक परफॉर्मन्स त्यांचे लक्ष वेधून घेईल. तो परफॉर्मन्स म्हणजे ऋतुराज आणि हर्षिता या स्पर्धकांनी आपल्या गोड आवाजात सादर केलेले त्यांच्या ‘आंखें’ चित्रपटातील ‘ओ लाल दुपट्टे वाली’ हे गाणे! ऋतुराज आणि हर्षिताचे गाणे ऐकून हे दोन्ही अभिनेते थक्क तर झालेच, पण त्यांना या चित्रपटाचे शूटिंग करताना आलेले अनुभव देखील आठवले.


व्यक्त केली बप्पी दांविषयी कृतज्ञता


 त्या सुंदर दिवसाची आठवण काढत आणि त्याला प्रेक्षकांचे जे प्रेम मिळाले, त्याने भारावून जात गोविंदाने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील एक आठवण सांगितली. डिस्को किंग बप्पी लाहिरी यांची आठवण काढत गोविंदाने आपल्याला स्टार बनवण्याचे श्रेय बप्पी दांना दिले. तो म्हणाला, ‘सुपरस्टार सिंगर 2च्या या मंचावर मी बप्पी दांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांच्याशिवाय माझा हा प्रवास शक्य झाला नसता.’


मी सदैव त्यांचा ऋणी राहीन : गोविंदा


‘आज मी जो ‘गोविंदा’ आहे, तो केवळ त्यांच्या गाण्यांमुळेच आहे. त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. अशा महान लोकांचे आशीर्वाद कलाकारासाठी जादूच करत असतात. माझ्याकडेच पाहा ना, माझ्याकडे त्यावेळी काहीच नव्हते. पण, त्यांच्या छायेत राहून मी स्टार झालो. माझ्या चित्रपटांसाठी इतकी छान छान गाणी दिल्याबद्दल मी खरोखर त्यांचा ऋणी आहे.’, असेही तो म्हणाला. गोविंदाने हे देखील सांगितले की, गाण्याच्या शब्दांबद्दल काही सूचना केल्यास बप्पी दा त्या सूचनेला मान द्यायचे.


हेही वाचा :