अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘जय भवानी जय शिवाजी’मध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारणार!
अभिनेते अजिंक्य देव यांनी छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडे साकारणार आहेत.
![अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘जय भवानी जय शिवाजी’मध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारणार! Ajinkya Dev's comeback on the small screen, will play Bajiprabhu Deshpande in 'Jai Bhavani Jai Shivaji' serial अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, ‘जय भवानी जय शिवाजी’मध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/15/e969598f7bd6f471e58c595753628898_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : स्टार प्रवाहवर 26 जुलैपासून रात्री 10 वाजता सुरु होणाऱ्या 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडे यांच्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. हे ऐतिहासिक पात्र साकारण्यासाठी ते खूपच उत्सुक आहेत.
या भूमिकेविषयी सांगताना अजिंक्य देव म्हणाले की, "माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अशा या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीच मी नेहमीच जागरुक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे. स्टार प्रवाह सध्याची नंबर वन वाहिनी आहे. याआधी प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमाच्या काही भागांचं मी सूत्रसंचालन केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत या मालिकेच्या निमित्ताने काम करण्याचा योग आला आहे."
स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून 26 जुलैपासून रात्री 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा आपण पाहिली आहे. ती वर्णावी तेवढी थोडीच आहे. आकाश ठेंगणं पडेल असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. राजा असावा तर असा. या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अशा शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच मातीशी निगडीत आणि रुतलेल्या सशक्त कथा सादर करण्याचा प्रयत्न करत असते. ही मालिका त्या सर्व शूर वीरांना अर्पण असेल. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा."
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)