पाऊस होता, ट्रॅफिक होतं, त्याचवेळी माझा मोबाईल गाडीतून लुटून नेला; भारत गणेशपुरे यांचा थरारक अनुभव
तीन दिवसांपूर्वी मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळला. यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीचा फायदा घेत काही चोरट्यांनी अभिनेता भारत गणेशपुरे यांचा मोबाईल गाडीतून चोरला. या प्रसंगाचा अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या पावसाचा फटका सर्वसामान्यांसह 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता भारत गणेशपुरे यांनाही बसला. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर त्यांना वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. वाहतूक कोंडी झाली असताना एका टोळक्याने भारत गणेशपुरे यांचा मोबाईल फोन चक्क गाडीतून चोरला. स्वत: भारत गणेशपुरे यांनी हा अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. माझ्या चुकीमुळे मोबाईल चोरीला गेला असं सांगत मदतीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीपासून सावध राहा, असं आवाहनही त्यांनी केलं.
तीन दिवसांपूर्वी मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळला. परिणामी वाहतूक बंद करण्यात आली. मात्र रस्त्यावर आधीपासूनच असलेल्या गाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याचाच फायदा घेत काही चोरांनी मदतीच्या बहाण्याने भारत गणेशपुरे यांच्या मोबाईल फोनवर डल्ला मारला.
या अनुभवाबद्दल सांगता भारत गणेशपुरे म्हणाले की, "आज माझा मोबाईल अक्षरशः लुटून नेला आहे. ही घटना कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या फ्लायओव्हरवर घडली. खूप पाऊस होता, काल दरड कोसळल्यामुळे तिथे खूप ट्रॅफिक होती. त्यावेळी दोन माणसं आली आणि त्यांनी खूप विचित्र पद्धतीने माझी गाडी ठोठावली, मात्र तरीही मी काच उघडली नाही. मात्र, माझ्या दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने कारचा दरवाजा उघडला. तो विचित्र हावभाव करत होता. मात्र त्याचवेळी माझ्या बाजूने एक माणूस आला आणि काच जोरात वाजवली. मी त्याच्याकडे पाहिलं, तर तेवढ्यात दुसऱ्या बाजूला असलेल्या माणसाने माझा मोबाईल चोरुन नेला."
निर्दयी म्हटलं तरी गाडीची काच उघडू नका : भारत गणेशपुरे "माझ्यासोबत ही घटना घडली आहे. मात्र, तुम्ही सतर्क राहा. सध्या कोरोनाची स्थिती आहे. कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्यासोबत अशापद्धतीची घटना घडली तर आधी तुमच्या गाडीचा सेंट्रल लॉक लावा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटलं तरी चालेल. दिवस वाईट आहेत. या प्रकारात बायका, मुलं, लहान मुलं अशी टोळी असते," असं गणेशपुरे यांनी सांगितलं.
माझ्या मूर्खपणामुळे मोबाईल गेला, पण तुम्ही काळजी घ्या ही टोळी कशाप्रकारे काम करते हे देखील भारत गणेशपुरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "पिछे का काच खुला है, मागच्या टायरमध्ये हवा नाही, समोरुन तुमच्या गाडीत स्पार्क होतोय, असे अनेक प्रकार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण तुम्ही गाडीतून उतरु नका. सुरक्षित ठिकाणी आल्यावर हे पाहा. फारफार तर त्या गाडीचा टायर खराब होईल. एवढंच होईल, बाकी काही होणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. माझा स्वतःचा मोबाईल माझ्या मूर्खपणामुळे गेला. त्या टोळीने माझ्या गाडीतून माझा मोबाईल लुटूनच नेला."
"मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला मदत करण्याचा आश्वासन दिलं आहे. पण तुम्ही काळजी घ्या," असं आवाहन भारत गणेशपुरे यांनी केलं.
संबंधित बातम्या
'अलिबाग' नव्हे 'आलेपाकवाले' घुसखोरी करतात : भारत गणेशपुरेंचे स्पष्टीकरण
भारत गणेशपुरे पुन्हा बोहल्यावर चढणार!