(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक वेळेतच घ्या : बाबासाहेब पाटील
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाची मागणी.महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांचा निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप.
अकोला : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक जाणीवपूर्वक पुढे ढकलण्याचा महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागानं केला आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक ही नियमानुसार वेळेतच घेण्याची मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. या मागणी संदर्भात पाटील यांनी कोल्हापूर विभागाच्या धर्मदाय उपायुक्तांना पत्र लिहिले आहे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष कोरोनाचे कारण पुढे करून मुद्दाम निवडणूक पुढं ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बाबासाहेब पाटील यांनी पत्रात केला आहे.
राज्यात सर्व निवडणुका होत असताना चित्रपट महामंडळाची निवडणूक का नाही? : बाबासाहेब पाटील
राज्यात सर्वच निवडणुका होत असताना चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला होत असलेल्या विलंबावर राष्ट्रवादीच्या चित्रपट विभागानं आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी पत्रात राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा संदर्भ आपल्या पत्रात दिला आहे. ते पत्रात म्हणतात की, महाराष्ट्रात आत्ताच कोरोना संदर्भातील सर्व अटी आणि नियम पाळून ग्रामपंचायत स्तरावर निवडणुका झाल्यात. यासोबतच महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणुका झाल्या आहेत आणि होत आहेत. महाराष्ट्र शासनाने कोरोनासंदर्भात अटी नियम दिल्या आहेत. त्या पाळून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक ही वेळेत आणि शासनाच्या नियमानुसार घ्यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. राज्यासह देशभरातील निवडणुका जर नियम अटी पाळून होत असतील, तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक का होऊ शकत नाही? असा सवालही या पत्रात करण्यात आला आहे.
महामंडळाचे अध्यक्ष जाणीवपूर्वक निवडणुक पुढे ढकलत आहेत : बाबासाहेब पाटील
महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे निवडणूक जाणीपूर्वक पुढे ढकलत असल्याचा आरोप यावेळी बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. महामंडळाची निवडणूक खूपच सोप्या पद्धतीची असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. या निवडणुकीत फक्त मुंबई, पुणे, आणि कोल्हापूर या तीन ठिकाणीच मतदान केंद्रं आहेत. सोबतच महामंडळाची सभासद संख्या देखील मर्यादित असल्याने कोरोना नियमांचे पालन करून ही निवडणूक सहज शक्य आहे. या सर्व बाबींमुळे चित्रपट महामंडळाची निवडणूक खूप सुटसुटीत आणि चांगली होऊ शकत असल्याची बाब राष्ट्रवादी चित्रपट विभागानं धर्मदाय उपायुक्तांना लिहिलेल्या पत्रात लक्षात आणून दिली आहे.
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाकडून महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.
या पत्रात राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागानं महामंडळाच्या कारभारावर टीका करीत प्रकाश टाकला आहे. या पत्रात महामंडळाच्या कारभारावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. गेले अनेक वर्ष चित्रपट महामंडळाकडून एकही वार्षिक सर्वसाधारण सभा व्यवस्थित भरवण्यात आली नसल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या बैठका नियमित होत नसल्याने धर्मदाय विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. महामंडळ अध्यक्षांनी संचालक मंडळाची बैठक लवकरात लवकर घ्यावी. सोबतच मुदत संपायच्या आधी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या बैठकीत महामंडळाच्या अध्यक्षांनी संपूर्ण पाच वर्षांचा अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवावा आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर कराव्यात असा आदेश धर्मदाय उपायुक्तांनी द्यावा अशी मागणी पत्राच्या शेवटी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह विजय पाटकर, प्रिया बेर्डे, संतोष साखरे, सविता मालपेकर, मिलिंद अष्टेकर आणि सुधीर निकम यांनी निवडणूक लवकर घेण्याची मागणी केली आहे.
अनेक कारणांनी गाजलं चित्रपट महामंडळाचं अध्यक्षपद :
कोल्हापूर येथे 26 नोव्हेंबर 2020 ला झालेल्या महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. ज्यात तेरा संचालकांपैकी आठ संचालकांनी राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अविश्वास व्यक्त केला होता. त्यावेळी प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी लवकरच पुढील बैठक घेऊन नवीन अध्यक्ष निवडले जातील असे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी सांगितले होते.
मात्र, 9 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सुशांत शेलार आणि निकिता मोघे यांनी मेघराज राजेभोसले यांना पाठिंबा दिल्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर झाला. महामंडळाच्या काही बैठकांमधला गोंधळही राज्यभरात गाजला होता.
चित्रपट महामंडळ अध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या या पत्रानंतर महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे काय उत्तर देतात? याकडे चित्रपट वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. चित्रपट महामंडळाचा या पाच वर्षातील कारभार अनेक वाद आणि सर्वसाधारण सभेतील गोंधळामुळे गाजला. त्यामुळे या पत्रातील आरोप पुढच्या काळात चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले कसे खोडून काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.