Suresh Gopi : केरळमध्ये भाजपचं खातं उघडलं, केंद्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही मिळाल्या; सुरेश गोपी यांच्यामुळे होणार सिनेसृष्टीला मदत?
Suresh Gopi Portfolio: दाक्षिणात्य अभिनेते सुरेश गोपी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून आता भाजप सरकारने अभिनेत्याला विशेष जबाबदारी दिली आहे. मोदी सरकारने अभिनेत्याला दोन मंत्रालयांचे राज्यमंत्री केले आहे.
Suresh Gopi Portfolio: दाक्षिणात्य अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी यांनी 9 जून 2024 रोजी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांना एनडीए सरकारमध्ये पर्यटन मंत्रालय, पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुरेश गोपी हे केरळमधील भाजपचे (BJP) पहिले खासदार आहेत, ज्यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सीपीएम उमेदवार व्हीएस सुनील कुमार यांचा 74,686 मतांनी पराभव केला.
निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने त्रिशूरसाठी 'एक केंद्रीय मंत्री, मोदींची हमी' असा नारा दिला होता. आता सुरेश गोपी यांच्याकडे हे मंत्रिपद देऊन पक्षाने आपले आश्वासन पूर्ण केलं असल्याचं म्हटलं जात आहे. एप्रिल 2016 मध्ये, राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून प्रख्यात व्यक्तिमत्वाच्या श्रेणीत निवड केली. या अभिनेत्याने ऑक्टोबरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.सुरेश गोपी यांच्या शपथविधीनंतर ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
2019 मध्येही लढवली होती निवडणूक
सुरेश गोपी यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले. निवडणुकीत त्यांनी ख्रिश्चन समाजापर्यंत पोहोचून विश्वास प्रस्थापित केला. याशिवाय अभिनेत्याने सीपीएमच्या सहकारी बँक निधी घोटाळ्याच्या विरोधात तळागाळात आंदोलन करून मतदारांना आपलेसे केले.
250 सिनेमांत केलंय काम
सुरेश गोपी हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे 250 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 'कवल', 'मैं हूं मुसा', 'लेलम', 'कमिशनर' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
संसदेत कलाविश्वातील मंडळींची लागणार हजेरी
सुरेश गोपी व्यतिरिक्त अनेक चित्रपटसृष्टींनीही भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली आहे. या यादीत कंगना राणौत, हेमा मालिनी, रवी किशन, मनोज तिवारी आणि अरुण गोविल यांचाही समावेश आहे. मात्र, मंत्रिमंडळात केवळ सुरेश गोपींना स्थान मिळाले आहे.
View this post on Instagram