माढ्यातल्या दिग्दर्शकाची कमाल; 'बेलोसा' लघुपटानं जिंकले तब्बल 25 पुरस्कार
माढ्यासारख्या ग्रामीण भागातील महेश भांगे यांनी बेलोसाच्या माध्यमातून जगभर भारताचे नाव पोहोचवले आहे .

Pandhrpur Madha News :ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वास्तवतेचे भान ठेवत आपल्या कलागुणांना दाखविण्याची विलक्षण क्षमता असते. सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचे नागराज मंजुळे, अकलूजच्या मकरंद माने किंवा अक्षय इंडीकर यांनी आपले कौशल्य आपल्या कामातून सिद्ध केले आहे. अशाच माढ्यातील एका तरुण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या बेलोसा या लघुपटाने आत्तापर्यंत 25 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावून आपली पात्रता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
बारावे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माढ्यातील मनोज भांगे यांनी दिग्दर्शित केलेल्या बेलोसा लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. मनोज भांगे हा माढा येथील रहिवासी असून भूमी अभिलेख कार्यालयात तो लिपिक पदावर काम करतो. पहिल्यापासून ग्रामीण जीवनातील लहान लहान गोष्टींचे बारकावे आणि त्यांचा अभ्यास हा त्याचा स्वभाव असल्याने बेलोसा हा लघुपट पाहताना त्याचे कौशल्य दिसून येते.
अनेक जगभरातून आलेल्या फिल्म्समधून बेलोसाची निवड करण्यात आली असून याच चित्रपट महोत्सवामध्ये जय भीम सारख्या गाजलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तर फरहान अख्तरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आणि महानायक अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यामध्ये मनोज भांगे यांच्या लघुपटाचा डंका संपूर्ण जगभर गेला आहे.
मनोज भांगे यांच्या बेलोसा या लघुपटाला विविध नामांकित चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत.
राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक.
बायोस्कोप मुंबई चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट संगीत.
कलबुर्गी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट सहबालकलाकार.
अरवली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट बालकलाकार.
आंतरराष्ट्रीय कल्चरल आर्टीफॅक्ट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपट.
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेलोसाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
अशा अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आत्तापर्यंत बेलोसाला तब्बल 25 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माढ्यासारख्या ग्रामीण भागातील महेश भांगे यांनी बेलोसाच्या माध्यमातून जगभर भारताचे नाव पोहोचवले आहे .
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
