Shweta Tiwari: मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का? घाणेरड्या भाषेतील कमेंट अन् मेसेजवर अभिनेत्री श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; नेमकं काय घडलं?
Shweta Tiwari: स्वतःला 'मराठी माणूस' व राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून अत्यंत अश्लील शब्दांत शिवीगाळ केली जात असल्याचं श्वेताने म्हटलंय.

Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) सोशल मीडियावर महिलांविरोधात वापरली जाणारी असभ्य भाषा आणि ट्रोलिंगवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर ट्रोलर्सविरोधात संताप व्यक्त करत अशा काही प्रोफाईल्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत, ज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थकांचाही समावेश आहे. स्वतःला 'मराठी माणूस' व राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून अत्यंत अश्लील शब्दांत शिवीगाळ केली जात असल्याचं श्वेताने म्हटलंय. या संपूर्ण प्रकारावर अत्यंत संतापलेल्या श्वेताने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ट्रोल्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.(Shweta Tiwari)
प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही चाहत्यांची आवडती असली, तरी तिला अनेकदा ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावर महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह आणि शिवीगाळयुक्त भाषेवर तिने मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या व्यक्तीला स्वतःचे कुटुंब आणि मुले आहेत, ती व्यक्ती ऑनलाइन एखाद्या महिलेला इतक्या हलक्या दर्जाची शिवीगाळ कशी करू शकते, असा आश्चर्यकारक सवाल तिने केला आहे.(Shweta Tiwari)
Shweta Tiwari: श्वेता तिवारीचे ट्रोलर्सना जशास तसे उत्तर
श्वेताने इन्स्टाग्राम स्टोरीवर एकापाठोपाठ एक अनेक पोस्ट शेअर करत तिला वैयक्तिक मेसेज (DM) करून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या युजर्सचा बुरखा फाडला आहे. तिने त्या युजर्सच्या ओरिजिनल प्रोफाईलचे स्क्रीनशॉट्स थेट शेअर केले. यातील काही प्रोफाईल्स मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या किंवा समर्थकांच्या आहेत.
श्वेताने लिहिले की, "महिलांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करणे ही आता एक सामान्य गोष्ट बनली आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यावरून लोकांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडते." तिने पुढे म्हटले की, अशा अभद्र भाषेचा वापर सुशिक्षित आणि व्यावसायिक (प्रोफेशनल) लोकसुद्धा करत आहेत. असे लोक ज्यांच्या घरात स्वतःची आई, बहीण, पत्नी आणि मुलगी आहे! "एका दुसऱ्या स्त्रीला अश्लील शिवीगाळ केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबात परत घरी कसे काय जाऊ शकता?" असा सवाल तिने उपस्थित केला.

Shweta Tiwari: राज ठाकरेंना विचारला थेट सवाल
राज ठाकरे यांच्या समर्थनाशी संबंधित मजकूर असलेल्या एका युजरची प्रोफाईल दाखवत श्वेताने लिहिले, "हा व्यक्ती राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा समर्थक आहे. या गोष्टीमुळे माझी एक खूप वैयक्तिक भावना समोर येते. कारण मी आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले आहे. माझ्या वडिलांचे संगोपन मुंबईत झाले आणि माझा जन्म अन् संगोपनही मुंबईतच झाले. आयुष्यभर मी एका 'मराठी माणसा'शी जोडलेला स्वाभिमान आणि प्रतिष्ठा पाहत मोठी झाले आहे. मराठी महिलांना अभिमानाने 'मी मराठी मुलगी' असे म्हणताना मी ऐकले आहे."
"मराठी संस्कृती महिलांचा, त्यांच्या ताकदीचा आणि सन्मानाचा आदर करते, याच विश्वासात मी मोठी झाले आहे. परंतु, जेव्हा एखादा मराठी माणूस एखाद्या स्त्रीला वैयक्तिक मेसेज करून शिवीगाळ करतो, तेव्हा मला धक्का बसतो. मराठी माणसाचा अर्थ हाच असतो का? जेव्हा स्वतःला अभिमानाने 'मराठी माणूस' म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन त्यांना रां** म्हणतात, तेव्हा मला खरंच विचारावं वाटतं की 'मराठी माणूस' असण्याचा हाच अर्थ आता उरलाय का? राज ठाकरेजी, जर असे लोक तुमचे समर्थक असतील, तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की, त्यांचं असं वर्तन तुम्हाला मान्य आहे का? कारण फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी माणूस म्हणवणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं नक्कीच पुरेसं नाही," असं पुढे श्वेता तिवारीने लिहिलं.
श्वेता तिवारीने संताप व्यक्त करत लिहिलं, "एखादी महिला तुमच्या ओळखीची नाही म्हणून तिचा आदर कमी होत नाही. आणि तुम्ही तिच्याशी असहमत आहात, ती तुम्हाला आवडत नाही किंवा म्हणून तुम्हाला तिला शिवीगाळ करण्याचा अधिकार आहे, असं नाही. त्यामुळे फक्त ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच महिलांचा नाही, तर सर्वच महिलांचा आदर करा."





















