Video: मराठी असाल तर बघू नका..; अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना समर्थन, सयाजी शिंदे, सायली संजीवकडून व्हिडिओ, पिंजऱ्यातला 'मराठी माणूस'
2052 Vision Video Raises Marathi Language Concerns: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर. अभिनेता सयाजी शिंदे यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Marathi Identity Ahead of BMC Elections: सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष आहे. सर्वच नेत्यांनी प्रचारासाठी मैदान गाठले आहे. सध्या प्रमुख नेत्यांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. बीएमसी ही भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, महायुती असो किंवा महाआघाडीतील नेत्यांचे या महापालिकेच्या निवडणुकांकडे लक्ष आहे. महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली. मरठी अस्मितेसाठी त्यांनी युती केली असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी युती जाहीर करताच, मुंबईचा महापौर मराठीच होणार, असं छातीठोकपणे सांगितलं होतं. मराठी माणूस जागे व्हा, असं राज ठाकरे वारंवार सांगताना दिसतात. मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा असो किंवा राज्यातील मराठी शाळांमध्ये होणारी घट. ठाकरे बंधूंनी मराठी माणसांना होणाऱ्या घुसमटीवर कायम आवाज उठवला. आजही राज ठाकरे आपल्या भाषणातून 'मराठी माणसा जागा हो', असं मराठी जनतेला आवाहन करताना दिसत आहे. दरम्यान, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सयाजी शिंदे आणि सायली संजीव यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत 2052चं चित्र दाखवण्यात आलं आहे. 2052 पर्यंत मराठी माणसाची काय अवस्था होऊ शकते, हे दाखवण्यात आलं आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओत बाप लेक बॉम्बे झोन (For Endangered Species) मध्ये जातात. या व्हिडिओत अभिनेता भरत जाधव पिंजऱ्यात दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओत भरत जाधव एकटा मराठी माणूस दाखवण्यात आला आहे. तर, बाप लेक हे हिंदीत बोलत आहेत. लहान मुलगा 'बॉम्बे', असं म्हणतो. तेव्हा भरत जाधव 'बॉम्बे' नसून, मुंबई असं म्हणतो. 'या जगात मी माझं अस्तित्व गमावून बसलो आहे' असं भरत जाधव म्हणताना दिसत आहे. मराठी भाषा, मुंबईत असणारी मराठी माणासांची घरे, जमिनीचे सौदे, हक्काच्या नोकऱ्या,या विषयांवर बोलताना दिसत आहे. 'मराठी माणसांना हकललं गेलं', 'काही राज्यकर्ते आमच्या अस्तित्वाची दलाली करत होते', असा आरोप व्हिडिओतून करण्यात आला.
दरम्यान, व्हिडिओच्या शेवटी लहान मुलगा, 'याविरोधात कुणी आवाज का उठवला नाही?', असा प्रश्न विचारतो. तेव्हा 'एक होता ना..'असं म्हणतो.. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठी भाषेच्या संदर्भातील भाषणातील व्हिडिओ सुरू होतो. तसेच मराठी भाषिकांचा घसरता आकडा दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओतून मराठी भाषिकांना संदेश देण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून, याची चर्चा होत आहे.
























