Sanjay Mone Reply To Trolls Over Madhuri Dixit: 'तितकी तुमची लायकी असली पाहिजे...', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केल्यानं संजय मोने ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाले...
Sanjay Mone Reply To Trolls Over Madhuri Dixit: माधुरीच्या आधी अनेक दिग्गजांनी या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. सुरुवातीला जेव्हा 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर मराठीत 'कोण होणार करोडपती'ची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी सचिन खेडकरांनी शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.

Sanjay Mone Reply To Trolls Over Madhuri Dixit: सध्या सोनी मराठीवरचा (Sony Marathi) 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा क्विझ शो प्रचंड चर्चेत आहे. त्यासाठी कारण ठरतंय, या शोचा होस्ट. या प्रसिद्ध शोचं सूत्रसंचालन यावर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री, असंख्य चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). माधुरीसोबत हॉटसीटवर बसून खेळ खेळणं अनेकांसाठी पर्वणी ठरतंय. पण, सध्या माधुरीच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित करणारी एक पोस्ट भलतीच व्हायरल होतेय, ती पोस्ट म्हणजे, मराठी अभिनेते संजय मोने यांची.
माधुरीच्या आधी अनेक दिग्गजांनी या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आहे. सुरुवातीला जेव्हा 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर मराठीत 'कोण होणार करोडपती'ची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी सचिन खेडकरांनी शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांनीही शोचे सूत्रसंचालन केलंय. आणि आता माधुरी दीक्षित या शोचं सूत्रसंचालन करतेय. अशातच आता संजय मोने यांनी फेसबुकवर पोस्ट करुन थेट तिच्या सूत्रसंचालनावरती प्रश्न उपस्थित केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, अनेकांनी संजय मोने यांना ट्रोलही केलं. अशातच संजय मोने यांनी आणखी एक पोस्ट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
संजय मोने ट्रोलर्सना नेमकं काय म्हणाले? (Sanjay Mone Reply Over Madhuri Dixit)
संजय मोने यांनी ट्रोलर्सना सणसणीत टोला लगावत रिप्लाय दिलाय. संजय मोने ट्रोलर्सना म्हणाले की, "परवा एक नोंद मी लिहिली त्यात बच्चन साहेब आणि माधुरी बाई साहेब यांच्या बद्दल लिहिलं होतं.मला त्यात दोघांच्याही बद्दल कलाकार म्हणून काहीही गैर लिहायचं नव्हतं. प्रश्न फक्त सादर करण्याबद्दल होता. माधुरी बाईच्या दिसण्यात काहीही उणीव काढताच येत नाही. त्या उत्तम अभिनेत्री आहेत पडद्यावर सर्वोत्कृष्ट नृत्य सादर करतात. पण ज्या लोकांनी माझ्यावर भरघोस टीका केली त्यात माझ्या एकंदर लायकी बद्दल असंख्य प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल मला फक्त हसायला आले..."
संजय मोने पुढे बोलताना म्हणाले की, "काही लोकांनी माझ्या मुलीबद्दल "तिला करायला सांगा हा कार्यक्रम", असाही प्रश्न उपस्थित केला माझ्या पत्नीबद्दल ही काहीबाही लिहिलं... माझी पत्नी माझ्याहून जास्त लोकप्रिय आहे असं ही लिहिलं त्यामुळे मी चिडून काही प्रत्युत्तर करेन असंही त्यांना वाटलं. पण ती जास्त लोकप्रिय आहे आणि अधिक गुणी आहे हे मी 27 वर्षांपूर्वी मान्य केलं आहे. आणि काही लोकांनी माझ्या मुलीला तिनं कार्यक्रम करायला सांगा असाही प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल उत्तर... माझी मुलगी आपल्या सगळ्यांच्या मनातही येणार नाही अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन सध्या ऑस्ट्रेलिया इथे नोकरी करत आहे. त्या आधी ती माननीय प्रकाशबाबा आमटे यांच्याकडे दीड महिना राहून आली आहे. जिथे no mall, no macdonald no movie ही परिस्थिती होती..."
"इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनही मराठी बोलतांना तुम्ही ऐकणा-या कुठल्याही कलाकारा सारखं तिच्या वाक्याची सुरुवात so ह्या शब्दांनी होत नाही.तिला हवं ते अधिक शिक्षण घेऊन मायदेशी येण्याची तीव्र इच्छा आहे पण तिच्या शिक्षणाचा उपयोग इथे आजतरी किंवा नजीकच्या भविष्यात नाही.आणि माझ्या लायकीबद्दल ज्यांनी लिहिले आहे त्यांना एकदाच उत्तर देऊन त्यांची कीव करावी ही ही त्यांची "लायकी"नाही पण... मी 42 वर्ष या व्यवसायात आहे. 60 नाटकं. 40 चित्रपट आणि 30 मालिका, 9 चित्रपट लेखन 7 नाटकांच लेखन केलं आहे. 100 हजार स्तंभ लेखन केलं आहे...", असं संजय मोने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय.
"मला शिव्या देणाऱ्या लोकांना हेच सांगायचं आहे की, समोरच्या माणसानं आपलं मत मांडलं, तर त्याला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार अगदीच मान्य आहे पण... तितकी तुमची लायकी असली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यातली एकही व्यक्ती मला तरी नामवंत वाटली नाही. आता राहिला शेवटचा प्रश्न, "तुम्ही एकदा KBC सारखा कार्यक्रम करून दाखवा" तर मी मराठीत "कानाला खडा" नावाचा कार्यक्रम करून दाखवला आहे. याशिवाय इतरही कार्यक्रमांच सूत्र संचालन केलं आहे. या उप्पर आता हा विषय मी संपवला आहे, कारण ज्यांनी ज्यांनी लिहीलं आणि ते लिहितांना जितके शब्द वापरले तितक्या संख्येची पुस्तक मी वाचलेली आहेत...", असंही संजय मोने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.
संजय मोनेंनी माधुरीच्या सूत्रसंचालनावर काय पोस्ट लिहिलेली?
ज्येष्ठ मराठी अभिनेते संजय मोने यांनी माधुरी दीक्षित 'कोणार होणार करोडपती' होस्ट करतेय, त्याबद्दल एक पोस्ट केली होती. त्यात "का कुणास ठाऊक पण आज दीक्षित बाईंचा कार्यक्रम बघितला आणि एक जुनी मराठी म्हण आठवली "कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी" त्यापेक्षा सचिन खेडेकर तोच कार्यक्रम अप्रतिम सादर करायचे," असं लिहिलं होतं. या पोस्टवरून अनेकांनी संजय मोने यांच्यावर टीका केलीय. या टीकेला त्यांनी सणसणीत उत्तर दिलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















