Sankarshan Karhade : कविता ऐकून राज ठाकरेंनी संकर्षणला थेट शिवतीर्थवर बोलावून घेतलं अन् बाहेर पडताना म्हणाले, 'घरच्यांना सांगा सुखरुप..'
Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकून राज ठाकरे यांनी देखील संकर्षणला बोलावून घेत त्याच्याशी संवाद साधला.
Raj Thackeray on Sankarshan Karhade : महाराष्ट्राच्या राजकारणावर कविता व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांमधील रसिक प्रेक्षकांनीही देखील संकर्षणला (Sankarshan Karhade) भरभरुन दाद दिली. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विनोद तावडे, आशिष शेलार यांनी फोन करुन संकर्षणच्या या कवितेचं कौतुक केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तर त्याला थेट शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. हा सगळा अनुभव संकर्षणने एबीपी माझासोबत संवाद साधताना सांगितलं.
संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या संकर्षण व्हाया स्पृहा या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. तसेच यावेळी त्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किलपणे टीप्पणी केलीये. त्याची ही कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून, महाराष्ट्रभरातून तिला भरभरुन प्रतिसाद येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच राज ठाकरे यांनी स्वत: फोन करुन संकर्षणला शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. हा अनुभव त्याने एबीपी माझासोबत संवाद साधताना सांगितलं.
राज ठाकरेंचा फोन आणि शिवतीर्थाचं आमंत्रण
कविता एकून संकर्षणला राज ठाकरेंनी फोन करुन शिवतीर्थावर भेटण्याचं आमंत्रण दिलं. यावर संकर्षणने म्हटलं की, मला राज साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला सकाळी 11 वाजता भेटायला बोलावलं. त्या दिवशी सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडलो. वेळेच्या आधी अडीच तास शिवाजी पार्कात फिरत होतो. का तर मला फार धाकधूक होती. मी त्यांच्या घरात पोहचल्यावर घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला की मी त्यांच्या घरात येऊन बसलोय. तेव्हापासून माझे बाबा सारखे बीपी चेक करत होते. हे मी त्यांना सांगितलं, त्यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी मला मिश्किलपणे म्हटलं की, घरच्यांना सांगा सुखरुप बाहेर पडलोय म्हणून.
राज ठाकरे यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा
शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यावर संकर्षणसोबत गप्पा मारल्याचं त्याने एबीपी माझाला सांगितलं. यावर त्याने म्हटलं की, राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ताई देखील होत्या. मी त्यांच्याशी बोलताना एकदाही त्यांनी मला तू असं का लिहिलं, तसं का लिहिलं काहीही विचारलं नाही. त्यांनी माझ्याशी नेहमीसारख्या गप्पा मारल्या. कुठे राहतोय, तुझं कसं चाललंय, नाटक काय म्हणतंय, घरी कोण कोण कसतं, सिनेमा, राजकारण, भारत, महाराष्ट्र अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्यांनी अगदी आनंदाने केली.