Priya Bapat : 'तेव्हाचा राग अजुनही माझ्या मनात तसाच आहे', प्रिया बापटने सांगितला आयुष्यातला 'तो' भयनाक किस्सा
Priya Bapat : अभिनेत्रींच्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडतात, ज्यांचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. असाच एक अनुभव अभिनेत्री प्रिया बापट हिने शेअर केलाय.
Priya Bapat : आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. हिंदी मराठीसह प्रियाने ओटीटी माध्यमांवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिटी ऑफ ड्रीम्स (City of Dreams) या सिरिजमध्ये प्रियाने साकारलेल्या पुर्णिमा गायकवाड या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. नुकतच प्रियाला झी मराठीचा मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. करिअरच्या उंचीवर असताना नुकतच या अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यातला एक भयानक किस्सा सांगितला आहे.
शहरी असो किंवा ग्रामीण भाग महिलांच्या सुरुक्षेचा प्रश्न हा कायमच उपस्थित केला जातो. कोणत्याही क्षेत्रात काम करत असो महिलांना त्यांच्या सुरक्षेचा विचार कायमच करावा लागतो. अभिनय क्षेत्र हे त्यातल्या त्यात कायमच प्रकाशझोतात असणारं क्षेत्र आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या बाबतीत असे अनेक प्रसंग घडतात, ज्यांचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. असाच एक अनुभव अभिनेत्री प्रिया बापट हिने शेअर केलाय. प्रियाने नुकतच हॉटर फ्लायला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला.
दादरच्या रस्त्यांवर घडलेला हा किस्सा
तुझ्यासोबत रस्त्यावरुन चालताना कोणती वाईट गोष्ट घडली आहे, असा प्रश्न प्रियाला यावेळी विचारण्यात आला. यावर उत्तर देताना प्रियानं म्हटलं की, मी आयुष्यात पहिल्यांदा ही गोष्ट शेअर करतेय. ही गोष्ट कोणालाच माहिती नाही. अर्थात माझ्या आईवडिलांना आणि माझ्या नवऱ्याला माहिती आहे. ही 2010 ची मुंबईतल्या दादरमधील गोष्ट आहे. माझ्या घराच्या समोरच्या गल्लीत हे घडलं होतं. मी दुसरीकडे कुठेच गेले नव्हते. मी शुटींग करुन आले होते आणि मैत्रीणीसोबत फोनवर बोलत होते. माझ्या दोन्ही हातात सामान होतं. एक माणूस समोरुन आला आणि त्याचे स्तन पकडले आणि तो पळून गेला. नेमकं काय घडलं हे मला समजायला पुढचे तीन सेकंद लागले. मी त्याच जागी उभी होते. नक्की काय घडलंय हेच मला कळत नव्हतं. पण मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा तो तिथून पळून गेला होता.
माझे बाबाही तेव्हा एक पुरुष म्हणून असहाय्य झाले होते - प्रिया बापट
पुढे बोलताना प्रियाने म्हटलं की, मी तिथून तशीच घरी गेले. माझी आई तेव्हा घरी नव्हती पण बाबा होते. पण बाबांना हे कसं सांगायचं हेच मला कळत नव्हतं. मी फक्त रडत होते. बाबांनी तेव्हा मला विचारलं की काय गं काय झालं. तेव्हा मी त्यांना सांगितलं काय झालं ते. तेव्हा बाबांना एक पुरुष म्हणून फार असहाय्य वाटत होतं आणि ते मी पाहिलं होतं. त्यांना कळतच नव्हतं की नक्की काय करावं. त्यांनी माझं उगाचचं सांत्वनही केलं नाही, की हे असं कसं झालं वैगरे किंवा त्यांनी उगाच हे तुझ्याबरोबरच कसं होऊ शकतं. वैगरे असंही काही झालं नाही. कारण ते कुठे त्याला शोधुन काढणार होते.
तेव्हाचा राग माझ्या मनात अजूनही तसाच आहे - प्रिया बापट
त्या माणसाला फक्त मज्जा घ्यायची होती. त्याला वाटलं की हिच्या हातात सामान आहे, ही काहिच नाही करु शकत. पण ही भावना अत्यंत त्रासदायक आहे की, त्याला ती मजा घेता आली आणि मी काही करु शकले नाही. तेव्हापासून आजपर्यंत जर मला कोणाची नजर जरी वाईट आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा ती व्यक्ती मला जर स्पर्श करायला आली तर मी आधी तिला मारेन हीच भावना माझ्या मनात असते.कारण तो तेव्हाचा राग माझ्या मनात अजूनही तसाच आहे, असं प्रियाने यावेळी म्हटलं.