अरेरे! काहीच तासांत Netflix काढून टाकणार तुमचे आवडते चित्रपट, वेब सिरीज; काय डिलिट होणार?
या टायटल्ससाठी अंतिम स्ट्रीमिंग डेटही निश्चित करण्यात आली आहे. 1 जानेवारीनंतर हे चित्रपट आणि शो नेटफ्लिक्सवर उपलब्ध नसणार आहेत.

Netflix: नेटफ्लिक्सवर बिंज-वॉच करणाऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच धक्का देणारी आहे. जगभरात लोकप्रिय असलेलं ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स लवकरच आपल्या कंटेंट लायब्ररीत मोठा बदल करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2026 सुरू होण्यापूर्वीच अनेक गाजलेले चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शो नेटफ्लिक्सवरून हटवले जाणार आहेत. त्यामुळे तुमचे आवडते टायटल्स अजून पाहायचे असतील, तर आता वेळ हातातून निसटतोय.
नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला नवीन कंटेंट येत असला, तरी जुन्या आणि लोकप्रिय टायटल्सना निरोप देण्याची प्रक्रिया देखील सुरू असते. यावेळी हटवण्यात येणाऱ्या यादीत हॉलिवूडचे कल्ट क्लासिक्स, सुपरहिट फ्रँचायझी आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलेल्या कथा आहेत. विशेष म्हणजे, या टायटल्ससाठी अंतिम स्ट्रीमिंग डेटही निश्चित करण्यात आली आहे. 1 जानेवारीनंतर हे चित्रपट आणि शो नेटफ्लिक्सवर उपलब्ध नसणार आहेत.
नेटफ्लिक्स हा निर्णय का घेतोय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंटेंटचे परवाने (लायसन्स) संपत असल्याने अनेक चित्रपट आणि सीरिज हटवण्याचा निर्णय घेतला जात आहे. याशिवाय, नेटफ्लिक्स आपल्या प्लॅटफॉर्मवर नवा कंटेंट आणण्यासाठी लायब्ररी रिफ्रेश करत असतो. त्यामुळे दर काही काळाने जुने टायटल्स काढून टाकले जातात. यावेळी मात्र मोठ्या स्टार्सचे सिनेमे या यादीत असल्याने प्रेक्षकांची निराशा वाढली आहे.
या यादीत जॅक ब्लॅक, अँजेलिना जॉली, ब्रॅडली कूपर, ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सन, डकोटा जॉन्सन आणि मॅट डॅमन यांसारख्या दिग्गज कलाकारांचे चित्रपट आहेत. अनेक सिनेमे हे ‘ऑलटाइम फेव्हरेट’ मानले जातात, तर काहींनी बॉक्स ऑफिसवर अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.
नेटफ्लिक्सवरून हटवले जाणारे काही गाजलेले चित्रपट
क्रुक्ड हाऊस, बेबी ड्रायव्हर, कोच कार्टर, ब्लू बीटल, कॅप्टन फिलिप्स, क्रेझी रिच एशियन्स, डर्टी डान्सिंग, द मार्टियन, टॅक्सी ड्रायव्हर, ट्रेनिंग डे, स्कारफेस, ओशन्स 8, झिरो डार्क थर्टी, डोनी डार्को, रनअवे ब्राइड, द मास्क, हाऊ टू बी सिंगल, घोस्ट, द गुनीज, डॉक्टर स्लीप यांसारखे चित्रपट लवकरच गायब होणार आहेत.
कुंग फू पांडा, द हँगओव्हर, फिफ्टी शेड्स, जी.आय. जो, टॉम्ब रेडर आणि मेझ रनर यांसारख्या लोकप्रिय फ्रँचायझीही नेटफ्लिक्सवरून हटवल्या जाणार आहेत.
टीव्ही शो आणि सीरिजही होणार आउट
नेटफ्लिक्सवरील मिस्टर रोबोट, प्रिझन ब्रेक, लॉस्ट, हाऊस ऑफ लाईज आणि स्टार ट्रेक यांसारख्या गाजलेल्या सीरिजही लवकरच पाहता येणार नाहीत. एकूणच, जर या यादीतील एखादा चित्रपट किंवा सीरिज अजून तुमच्या ‘वॉचलिस्ट’मध्ये असेल, तर उशीर न करता लगेच पाहून घ्या. कारण काही तासांतच नेटफ्लिक्सवरून हे टायटल्स कायमचे गायब होणार आहेत.























