Gadad Movie : उलगडणार 'गडद' रहस्य; नेहा महाजनसोबतच बिग बॉसमधील 'हा' अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका
Gadad : काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'गडद'च्या मोशन पोस्टर रिलीज झाला.
Gadad Movie : मराठी सिनेसृष्टीत प्रथमच स्कूबा डायव्हिंगवर आधारलेला चित्रपट पहायला मिळणार असल्याचं एव्हाना सर्व रसिकांना माहित झालं आहे. 'गडद' (Gadad) असं टायटल असलेल्या आगामी मराठी चित्रपटात एक अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे. या निमित्तानं मराठी पडद्यावर रसिकांना पहिल्यांदाच स्कूबा डायव्हिंग पाहिल्याचा अनुभव घेता येईल. लोकप्रिय टिव्ही शो एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स 3 विजेता आणि 'बिग बॅास' फेम जय दुधाणे आणि मराठीतील हरहुन्नरी अभिनेत्री नेहा महाजन 'गडद'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'गडद'च्या मोशन पोस्टरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेत कुतूहल निर्माण करण्याचं काम केल्यानंतर आता ही जोडी रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवण्यासाठी सज्ज झाली आहे.
इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वराह सिंग यांनी 'गडद' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम यांनी केलं असून, दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. दिग्दर्शकीय पदार्पणातच प्रज्ञेशनं स्कूबा डायव्हिंगसारखा आव्हानात्मक विषय निवडल्यानं त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून, या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं नेहा महाजन प्रथमच जय दुधाणेसोबत दिसणार आहे. त्यामुळं प्रेक्षकांनाही एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री पहाण्याची संधी मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं शूटिंग शेड्यूल मालदिव्जमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. शूटिंग स्पॅाटवर शूट करण्यात आलेल्या नेहाच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर जणू धुमाकूळ घातला आहे. त्यावेळी जयसोबत नेहा मालदीवमध्ये काय करतेय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तरही आता स्पष्ट झालं आहे. दोघांनीही 'गडद' चित्रपटाच्या शूटिंगसाठीच मालदीवला मुक्काम ठोकला होता. आता दोघांचा पुढील मुक्काम गोव्यात असणार आहे. या चित्रपटात जरी प्रेक्षकांना प्रथमच स्कूबा डायव्हिंग पहायला मिळणार असलं, तरी कथानक नेमकं काय आहे हे रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. ते लवकरच उलगडणार आहे.
जय आणि नेहा या दोघांनाही या चित्रपटासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. दोघेही कठोर परिश्रम करून आपापल्या कॅरेक्टर्सना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनवीन गोष्टी शिकून आत्मसात करत त्यांचा 'गडद' चित्रपटासाठी वापर करत आहेत. या दोघांच्या जोडीला या चित्रपटात शुभांगी तांबाळे, नितीन गावंडे, आरती शिंदे यांच्यासह आणखी काही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मंदार इंगळे आणि नितीन गावंडे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर असून कार्यकारी निर्माते आहेत प्रवीण वानखेडे. डिओपी वेंकटेश प्रसाद या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करत आहेत. अभिषेक खणकर यांनी गीतरचना लिहिल्या असून, त्या संगीतबद्ध करण्याची जबाबदारी गायक-संगीतकार रोहित राऊतकडं सोपवण्यात आली आहे. आदिनाथ पोहनकरचं पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभणार असून किरण बुराडे यांनी या चित्रपटासाठी कॅास्च्युम डिझाईनींगचं काम केलं आहे.