Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीवर अंडी फेकून मारली, रेस्टोरंट्सच्या मालकाविरोधात केली तक्रार
Munawar Faruqui : मुंबईत कॉमेडीयन मुनव्वर फारुकी याच्यावर अंडी फेकून मारली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' चा विजेता असलेला, कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुनव्वर रेस्टोरंट्सच्या मालकाकडे पाहून ओरडत आहे. एका दाव्यानुसार, मुनव्वर फारूकीने 8 एप्रिल रोजीची ही घटना असून मुनव्वरवर अंडी फेकण्यात आली. मुनव्वरने या हॉटेलच्या मालकासह त्याच्या कर्मचाऱ्यांविरधात तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले जात आहे.
'ई-टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुनव्वर फारुकीला मिनारा मशिदीजवळील आपल्या रेस्टोरंट्समध्ये आमंत्रित केले होते. मात्र, मुनव्वर हा तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला. त्यामुळे चिडलेल्या या हॉटेलच्या मालकाने आणि स्टाफने त्याच्यावर अंडी फेकण्यास सुरुवात केली.
रेस्टोरंट्स मालकावर भडकला मुनव्वर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुनव्वर फारुकी रेस्टॉरंट मालकावर संतापताना दिसत आहे. गर्दी असलेल्या या ठिकाणी मुनव्वर भोवती त्याचे सुरक्षा रक्षक दिसून येत आहेत. घडलेल्या प्रकाराने मुनव्वर प्रंचड संतापलेला दिसून येत आहे.
Kalesh b/w Public and Munawar Faruqi's at Mashaallah Restaurant Followed by Egg-Throwing Incident"
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 10, 2024
pic.twitter.com/90vtRmdMSG
मुनव्वरसोबत सेल्फी घेण्यासाठी, त्याच्यासोबत रील करण्यासाठी गर्दी उसळली होती. मुनव्वर ज्या रेस्टोरंट्समध्ये गेला होता, त्या रेस्टोरंट्च्या शेजारी असलेल्या इतर रेस्टोरंट्स चालकांनी त्याला आपल्याकडे येण्याचा आग्रह केला होता. जेणेकरून फोटो, रीलवरून आणखी प्रसिद्धी त्यांच्या रेस्टोरंट्सला मिळेल. मात्र, मुनव्वरने नकार दिला. त्यातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरोधात विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हुक्का बारमध्ये पकडला होता मुनव्वर
काही दिवसांपूर्वी मुनव्वर फारुकी वादात अडकला होता. मुंबईतील एका हुक्का बारमध्ये हुक्का पित असताना त्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. हुक्का बारवर छापेमारीची कारवाई केली तेव्हा मुनव्वर फारुकी आणि त्याचे मित्र हुक्का पित असल्याचे आढळले होते, असे पोलिसांनी 'पीटीआय'ला सांगितले होते. मुनव्वरवर लावण्यात आलेली कलमे ही जामीन पात्र असल्याने त्याला नंतर सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
याआधी 2021 मध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. इंदूरमधील एका कॅफेमधील स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात भाजपचे काही कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांना मुनव्वरने हिंदू धर्मातील देवतांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला. त्यानंतर जवळपास 1 महिना मुनव्वर तुरुंगात होता. त्यानंतर मुनव्वरने स्टँडअप कॉमेडी सोडण्याचा निर्णय घेतला.