OTT Web Series: पुन्हा रंगणार सत्तेचं रणांगण! OTTवरील ही वेबसीरिज चुकूनही मिस करू नका, डोळ्यांची पापणीही लवणार नाही..
या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले असून, आता चौथ्या सीझनचा टीझरही रिलीज झाला आहे.

OTT Webseries: राजकारण, सत्तासंघर्ष आणि नाट्यमय घडामोडी प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. बिहारच्या राजकारणावर अनेक वेबसीरिज तयार झाल्या आहेत.ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या वेबसीरिजनी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. आपण ज्या वेबसीरिजबद्दल बोलत आहोत ती म्हणजे 'महाराणी'. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीने राणी भारतीची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरिज लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या आयुष्यापासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. या मालिकेचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले असून, आता चौथ्या सीझनचा टीझरही रिलीज झाला आहे. लवकरच हा नवा सीझन सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.
महाराणीची कथा काय आहे?
पहिल्या सीझनमध्ये राणी भारती या एका सामान्य गृहिणीपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा तिचा प्रवास दाखवण्यात आला आहे. दुसऱ्या सीझनमध्ये राणीचे राजकीय निर्णयांमधील स्वावलंबन, पती भीम सिंह भारती यांच्याशी झालेला संघर्ष, राजकीय कटकारस्थानातून त्यांची हत्या आणि त्याच हत्येप्रकरणी राणीला तुरुंगात जावे लागल्याची कथा दाखवण्यात आली होती. तिसऱ्या सीझनमध्ये राणी भारतीला तुरुंगात जाऊन तीन वर्षे झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तुरुंगात असतानाच ती बारावीची परीक्षा उत्तीर्ण होते. पक्षाचे महासचिव सत्येंद्रनाथ मिश्रा वारंवार तिचा जामीन मंजूर करून तिला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र राणी त्यासाठी तयार नसते. दुसरीकडे मुख्यमंत्री नवीन कुमार हे भीमा भारती यांच्या नावावर राजकारण करत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, राणीची भीती त्यांना सतत सतावत असते. अखेर राणी तुरुंगातून बाहेर कशी येते आणि पुन्हा सत्तेवर आपली पकड कशी मजबूत करते, हे तिसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळते.
नव्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार?
आता चौथ्या सीझनमध्ये ही कथा बिहारच्या सीमांपलीकडे जाऊन थेट दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्रीपदानंतर आता राणी भारतीचे लक्ष्य थेट पंतप्रधानपदावर असल्याचे टीझरमध्ये सूचित करण्यात आले आहे. त्याची झलकही टीझरमध्ये पाहायला मिळते. 'महाराणी' या वेबसीरिजची निर्मिती सुभाष कपूर यांनी केली असून, दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले आहे. सुभाष कपूर यांनी नंदन सिंह आणि उमाशंकर सिंह यांच्यासह या मालिकेचे लेखन केले आहे. या वेबसीरिजमध्ये हुमा कुरेशीसोबत अमित सियाल, विनीत कुमार, प्रमोद पाठक, कनी कुसरुती, अनुजा साठे, सुशील पांडे, दिव्येंदू भट्टाचार्य आणि सोहम शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.






















