मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं आता निर्माता करण जोहरवर मूव्ही माफियाचा मुख्य दोषी असल्याचा आरोप केला आहे. कंगनानं आपल्या ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत ट्वीट केलं आहे. ज्यात तिनं म्हटलं आहे की, "करण जोहर हा चित्रपट माफियांमधील मुख्य आरोपी आहे, एवढंच नाही तर अनेक लोकांचं जीवन बरबाद करुन तो खुलेआम फिरत आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही काही अपेक्षा करु शकतो का? सगळं मिटल्यावर तो आणि त्याची गॅंग माझ्याकडेही येईल", असं कंगनानं म्हटलं आहे.



अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनानं बॉलिवूडमधील नेपोटिझमवर वारंवार टीका केली आहे. तिने याधीही अनेकदा करण जोहरवर टीका केली आहे. तिने करण जोहरला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली होती. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ती म्हणाली होती की,  'मी भारत सरकारला करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची विनंती करतो. त्याने मला उघडपणे धमकावले आहे. मला आंतरराष्ट्रीय मंचावर इंडस्ट्री सोडण्यास सांगितले. सुशांतची कारकीर्द खराब करण्याची षडयंत्र रचले. उरी लढाई दरम्यान त्याने पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला आणि आता त्याने आमच्या सैन्याविरूद्ध एक एंटीनॅशनल चित्रपट बनवला.'





वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगनाने करण जोहरची गँग माझ्याविरोधात षडयंत्र करत असल्याचे देखील म्हटले होते. आधीदेखील कंगना राणौतने करण जोहरवर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. करण जोहर फक्त स्टार किड्सला प्रोत्साहन देत त्यांना चित्रपटात काम देत असल्याचे तिने म्हटले होते.


...तर चंबू गबाळ आवरुन आपल्या राज्यात जावं; संजय राऊतांकडून कंगनाचा समाचार


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांवर आरोप करणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवर आरोप केला आहे. भाजप नेते राम कदम यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांची जास्तचं भीती वाटते, असं ट्वीट केलं होतं. 'मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या, पण मुंबई पोलिसांकडून नको.' असं म्हणत तिने मुंबई पोलिसांवर अविश्वास जाहीरपणे व्यक्त केला होता. यावर ड्रग्जशी संबंधितांची नावं सांगणाऱ्या कंगनाला महाराष्ट्र सरकार सुरक्षा का देत नाही? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :